ठाणे : कळवा येथील महात्मा फुले नगर भागात रविवारी रात्री किरकोळ वादातून एका तरूणाची दोन अल्पवयीन मुलांनी हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आकाश निकाळजे (२३) असे मृताचे नाव असून याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महात्मा फुले नगर परिसरात आकाश निकाळजे राहतो. नवरात्रौत्सवात त्याचे याच परिसरातील एका १६ वर्षीय मुलासोबत वाद झाले होते. रविवारी रात्री याच कारणावरून पुन्हा दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने त्याच्या एका १७ वर्षीय मित्राला त्याठिकाणी बोलावले. त्याचा मित्र हातात चाकू घेऊन आला. त्याने आकाश याच्यावर चाकू हल्ला केला. यात आकाश याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.