शहापूर : वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन तसेच घरगुती कारणावरून सासरच्या मंडळींनी एका विवाहितेची छऱ्याची बंदुक झाडून हत्या केल्याची घटना तालुक्यातील अजनुप येथील बोंडारपाडा येथे घडली. रंजना भवर (२७) असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी नवरा, सासू, सासरा यांसह सहा जणांना शहापुर पोलिसांनी ताब्यात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तालुक्यातील अजनुप येथील बोंडारपाडा येथे राहणाऱ्या भवर कुटुंबातील रंजना हिला तिचा नवरा शिवा, सासू सावित्री, सासरा काळू व तिघे दिर वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत होते. गेल्या वर्षी सासरच्या त्रासाला वैतागून तिने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आपसात समझोता झाल्याने रंजना परत सासरी राहायला गेली होती. त्यानंतरही नवऱ्यासह सासरच्या मंडळींकडून तिला शारीरिक व मानसिक त्रास सुरूच होता.

हेही वाचा >>> ठाण्यातील कोंडीमुळे रिक्षा टंचाई; गावदेवी भागात प्रवाशांना अर्धा ते पाऊण तासानंतर उपलब्ध होतेय रिक्षा

मंगळवारी रात्री अखेर छऱ्याची बंदूक झाडून रंजनाची हत्या करण्यात आली, अशी तक्रार तिचा भाऊ पंढरी केवारी याने शहापुर पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी नवरा शिवा, सासू सावित्री, सासरा काळू व गजमल, बेंडू व आत्या या सहा जणांना शहापुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन करण्यासाठी रंजना चा मृतदेह जे जे रुग्णालयात रवाना करण्यात आला असल्याची माहिती शहापुर पोलिसांनी दिली. याबाबत शहापुरचे पोलीस उप अधीक्षक मिलिंद शिंदे व  पोलीस निरीक्षक अनंत पराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार हे तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of a married woman by firing a gun in shahapur police ysh