ठाणे : वर्तकनगर येथील जानकीदेवी चाळीत पब्जी गेममुळे झालेल्या वादातून एका २२ वर्षीय मुलाची हत्या झाल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला आहे. साहिल जाधव (२२) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रणव माळी (१९) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. तर इतर दोन अल्पवयीन मुलांचे वय १७ वर्षे आहे. तिघेही जण कोकणीपाडा आणि वर्तकनगर भागातील रहिवासी आहेत. सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास प्रणव माळी आणि दोन्ही अल्पवयीन मुले चाकू घेऊन साहिलच्या घराजवळ आले.  तिघांनीही साहिलवर चाकूने वार केले. हल्ल्यात साहिल गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तिघेही आरोपी फरार झाले. घटनेची माहिती साहिलच्या आईला मिळाल्यानंतर त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रणव माळी याच्यासह तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या प्रकरणी प्रणवला अटक केली आहे. तर इतर दोन अल्पवयीन मुलांचा ताबा पोलिसांकडे आहे. साहिल, प्रणव आणि इतर दोन अल्पवयीन मुले पब्जी गेम खेळत असत. प्रणव व त्याचे अल्पवयीन साथीदार हे पब्जी गेममध्ये गट तयार करत होते. तर साहिलही त्याचा दुसरा एक गट तयार करत होता. यातील एक गट हा दुसऱ्या गटावर गेममध्ये हल्ला करून हरवत होता. याच कारणावरून त्याची हत्या केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of one due to pubji game in thane akp