बदलापूरः दिलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावत असल्याने बदलापुरात एका व्यक्तीने आपल्या मित्राच्या सहाय्याने सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. १२ एप्रिल रोजी सेवानिवृत्त पोलीस आपल्या राहत्या घराबाहेरून बेपत्ता झाले होते. याप्रकरणातील आरोपीने मृत पोलिसाच्या खात्यातून विविध प्रकारे पैसेही वळते केल्याचे समोर आले आहे. त्यावरून आरोपीचा शोध लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूर पश्चिमेत राहणारे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी अशोक काळू मोहिते हे त्यांच्या राहत्या इमारतीच्या बाहेर फिरून येतो असे कुटुंबीयांना सांगून गेले. ते परत न आल्याने १३ एप्रिल रोजी त्यांचा मुलगा अमित यांनी दिलेल्या तक्रारीवरून बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात हरवल्याचा गुन्हा दाखल झाला. अशोक मोहिते यांचा शोध घेत असताना ते हरवल्यानंतर त्यांच्या बँक खात्यावरून १५ एप्रिलला एटीएममधून २५ हजार रुपये काढल्याचे समोर आले.

हेही वाचा – महिलेची छेड काढल्याच्या वादातून आंबिवलीत दोन गटात हाणामारी

बँकेत केलेल्या अधिक चौकशीमध्ये अशोक मोहिते यांनी बँकेत त्यांचा एक चेक गहाळ होवून त्याव्दारे रक्कम काढली असल्याबाबत कळविल्याचे दिसून आले. त्याबाबत अधिक चौकशी केली असता अशोक मोहिते यांच्या बँक खात्यावरून एकूण २ लाख ३ हजार रुपये महादू बाजीराव वाळकोळी याच्या बँक खात्यामध्ये वळती झाल्याचे दिसून आले होते. महादू वाळकोळी हा अशोक मोहिते राहत असलेल्या इमारतीमध्येच भाडेतत्त्वावर राहत होता. मोहिते हरवल्यापासून वाळकोळी घरी नव्हता. त्याने इमारतीच्या सुरक्षा रक्षकाकडे आणि मोहिते यांच्या मुलाकडे मोहिते घरी आले का अशी फोनव्दारे विचारणा केली होती. त्याचे वागणे हे संशयास्पद वाटल्याने त्यानेच पैशांच्या व्यवहारावरून अशोक मोहिते यांचे अपहरण केले असल्याचा संशय आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

हेही वाचा – मुंबईसह ठाण्यात उष्णतेची लाट कायम, पुढील चार ते पाच दिवस तापदायक

त्यानंतर पोलीस तपासाची चक्रे फिरली आणि अवघ्या काही तासांत मुरबाड तालुक्यातील दुधनोली येथून वाळकोळी याला अटक केली. त्याच्या ताब्यात अशोक मोहिते यांचे बँकेचे एटीएम कार्ड सापडले. त्याच्याकडे चौकशी केली असता अशोक मोहिते हे दिलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावत असल्यामुळे सहकारी लक्ष्मण जाधव याच्या मदतीने अशोक मोहिते यांना दम्याचे औषध देण्याच्या बहाण्याने देवघर धरण परिसरात निर्जनस्थळी घेवून जावून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे प्रेत तेथेच पुरले असल्याची कबुली दिली. त्यावरून तहसीलदार मुरबाड, सरकारी पंच यांच्या उपस्थितीत नमूद आरोपीच्या सांगण्याप्रमाणे शोध घेतला असता देवघर धरण परिसरातील झाडाझुडपांमध्ये दलदलीच्या जागेत जमिनीमध्ये पुरुन ठेवलेला अशोक मोहिते यांचा मृतदेह मिळून आला. बदलापूर पश्चिमेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरूण क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली किशोर शिंदे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे हनुमंत हुंबे योगेश बेंडकुळे आणि सहकाऱ्यांनी अवघ्या २४ तासांत हत्येचे गुढ उकलले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of senior citizen due to money dispute unraveling the murder of a retired policeman in badlapur ssb