तहसीलदार, पोलीस, महसूल विभागाकडून पाहणी; संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (स्वतंत्र मालवाहतूक मार्ग) प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणात मुरुमाची मागणी असून या प्रकल्पालगतच्या जमिनींतून मुरुमाचे बेकायदा उत्खनन होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका रात्रीत शेकडो गाडय़ा मुरूम काढल्यानंतर खड्डय़ांमध्ये काळी माती टाकून जमिनीचे सपाटीकरण करण्यात येत असल्याचा प्रकार बोईसरजवळ नेवाळे येथे उघडकीस आला. या प्रकल्पातील ठेकेदारच या मुरुमाचे उत्खनन करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी करून याबाबत तक्रार केली आहे. खोदकाम केलेल्या जागांची पाहणी करून कारवाई करण्याचा इशारा पालघरच्या तहसीलदारांनी दिला आहे.

Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
kalyan session and district court verdict on mandir masjid issue at durgadi fort
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शासनाच्या मालकीचा; न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला
Bhajepar gram panchayat won over 1 crore in prizes under various government schemes
गावकऱ्यांच्या परिश्रमाने ग्रामपंचायत झाली कोट्यधीश…
insurance scheme mango, cashew insurance,
विमा योजनेत जाचक अटी घालून कोकणातील आंबा – काजू बागायतदारांवर अन्याय

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मार्गाच्या भागातील काही खासगी मालकीच्या आणि आदिवासींच्या जमिनींवर खोदकाम करण्यात आले आहे. बोईसर व पालघर भागात मुरुमाची उपलब्धता मर्यादित असून हा मुरूम डोंगराळ भागात म्हणजेच प्रकल्पापासून काही अंतरावर उपलब्ध आहे. या मुरुमाच्या वाहतुकीवर गौण खनिज स्वामित्वधन अर्थात रॉयल्टी भरावी लागत असून हा सर्व प्रकार टाळण्यासाठी या प्रकल्पातील काही ठेकेदारांनी बेकायदा उत्खनन सुरू केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रकल्पालगतच्या ओसाड जमिनीत जेसीबी यंत्राच्या सहाय्याने रातोरात मोठय़ा आकाराचा खड्डा खोदून त्या ठिकाणी असलेला मुरूम काढला जातो आणि त्याची लगेचच वाहतूक केली जाते. खणलेल्या खडय़ात तात्काळ काळी माती टाकून सकाळ होईपर्यंत या भागाचे सपाटीकरण केले जाते. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत.

बोईसर जवळील नेवाळे पूर्वेकडील आदिवासींना वनहक्क दाव्यातून वाटप केलेल्या जमिनीत अशा प्रकारे उत्खनन करण्यात आले आहे. येथे एक एकर भूखंडावर ३० ते ४० मीटर खोल खोदकाम केल्याचे उघडकीस आले आहे. या ठिकाणी खोदकाम करत असल्याचे समजताच गावकऱ्यांनी हे काम बंद पाडले. ग्रामस्थांनी याबाबत बोईसर पोलिसांना तक्रार केल्याने घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. महसूल विभागातही याबाबत तक्रार करण्यात आली असून त्यांच्या पंचनाम्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, नेवाळे येथे मुरूमासाठी रातोरात खोदाई केलेल्या जागेची पाहणी महसूल विभागाच्या बोईसर मंडळाचे अधिकारी संदीप म्हात्रे आणि  तलाठय़ांनी बुधवारी संध्याकाळी केली. यावेळी संपूर्ण जागेचे मोजमाप करून संबंधित खोदकाम करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

पाटाला धोका

नेवाळे येथे खोदकाम केलेल्या जागेच्या बाजूला सूर्या सिंचन क्षेत्राचा पाट असून खोदकामामुळे पाटालाही धोका निर्माण झाला आहे. या पाटाच्या आजुबाजुला कोणत्याही प्रकारच्या खोदकामावर बंदी आहे. मात्र येथे बेसुमार खोदकाम केल्याने प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नेवाळे येथील आदिवासींच्या जमिनींवर आणि अन्य ठिकाणी खोदकाम केलेल्या जागेची पाहणी करून त्यानुसार कारवाई केली जाईल.

-महेश सागर, तहसीलदार, पालघर.

नेवाळे येथे आदिवासींच्या जमिनीवर मोठय़ा प्रमाणात हजारो ब्रास मुरुमाची खोदाई करण्यात आली आहे. रातोरात खोदाई करून आणि सकाळी माती टाकून खड्डे बुजवले जातात. तलाठय़ांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

– महेश पाटील, पोलीस पाटील, नेवाळे.

Story img Loader