देणे आणि मागणे या दोन्ही क्रिया आपल्या जीवनात अगदी सहज सुरू असतात. परंतु मागण्यापेक्षा देण्याची क्रिया आपल्या संस्कृतीत अतिशय महत्त्वाची मानली आहे. आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळ म्हणजेच ठाणेकरांच्या लाडक्या अत्रे कट्टय़ाने नुकतेच १५ व्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्ताने ‘दान करी रे’ हा विशेष कार्यक्रम रविवारी सकाळी सरस्वती विद्यामंदिर शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता.
कुणी प्रेमाची तर कुणी भक्तीची देवाणघेवाण करतात. अशा या देण्यावर कवींनी अनेक कविता लिहून ठेवल्या आहेत आणि संगीतकारांनी त्यांना अजरामर चाली देऊन ती गाणी रसिकांच्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवण्यास मदत केली. आचार्य अत्रे कट्टय़ावरील सर्व मंडळी या कार्यक्रमाला हजर होतीच, शिवाय रसिक ठाणेकरांनीही मोठय़ा संख्येने कार्यक्रमाला हजर राहून दाद दिली. ‘दान’ या विषयाभोवती गुंफलेली आणि रसिकप्रिय असलेली निवडक गाणी अतिशय उत्तम पद्धतीने या मैफलीत सादर झाली. संकल्पना आणि सूत्रसंचालन धनश्री लेले यांचे होते. ‘मागणं ज्यांच्याकडे मागावं, जो ते पूर्ण करेल’ असे सांगताना त्यांनी ८ मे रोजीच जयंती असलेल्या रवींद्रनाथ टागोरांची एक आठवण सांगितली. रवींद्रनाथ टागोरांनी गांधीजींकडे शांती निकेतन शाळेसाठी मदत करा, असे सांगितले. गांधीजींना रवींद्रनाथांचे कष्ट आणि तळमळ माहिती होती. त्यामुळे त्यांनी ओळखीच्या व्यक्तीला रवींद्रनाथांना मदत करण्याचा सल्ला दिला. त्या व्यक्तीने त्यांना हवी ती मदत केल्यानंतर रवींद्रनाथांनी जेव्हा गांधींजींची भेट घेतली, तेव्हा गांधीजींना ‘काय हवं ते मागा’ असे सांगितले. त्यावर गांधीजींनी तुम्ही दुपारी १५ मिनिटे तरी वामकुक्षी घ्यावी असे मागणे मागितले आणि रवींद्रनाथांनी ते पाळले अशी देवाणघेवाणीची सुंदर उदाहरणे कार्यक्रमाच्या ओघात श्रोत्यांपुढे गाण्यांसोबत सादर झाली. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे’ या कवितेद्वारे दान किती श्रेष्ठ आहे याची कल्पना दिली आहे.
श्रीरंग भावे, मंदार आपटे, प्रीती निमकर-जोशी यांनी अतिशय तयारीने गाणी सादर केली. त्यामुळे रविवारची सकाळ छान साजरी झाल्याचे भाव रसिक प्रेक्षकांच्या मनावर उमटत होते. ‘गगन सदन तेजोमय’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मग ‘तुझे गीत गाण्यासाठी सुर लागू दे’ सादर झाले. मंदार आपटेंनी गायलेल्या ‘दिल्या घेतल्या वचनाची शपथ तुला आहे’ या गाण्याला विशेष दाद मिळाली. त्यानंतर ‘सखी मंद झाल्या तारका,’ ‘कोमल वाचा दे रे राम,’ ‘या सुखांनो या’ या गाण्यांबरोबरच प्रीती ने गायलेल्या ‘तू बुद्धी दे’ आणि ‘एक हौस पुरवा महाराज’ या गाण्यांना श्रीरंग आणि मंदार यांनी कोरसची झकास साथ दिली. तालासुरांच्या या विश्वात माणूस पटकन रममाण होतो आणि त्यांच्या भावभावना प्रकट करण्यास अधिक वाव मिळतो. ‘देणाऱ्याचे हात हजार दुबळी माझी झोळी’ हे गाणे सादर झाल्यानंतर प्रेक्षकांनी ‘क्या बात है’ अशी भरभरून दाद दिली. ‘चिन्मया सकल ऱ्हदया’ या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. झंकार कानडे यांनी की-बोर्डवर तर संवादिनीवर विक्रम मुजुमदार यांनी साथ दिली. अमित देशमुख (तालवाद्ये) तर अमेय ठाकुरदेसाई (तबला) यांनीही त्यांच्या वादनाने मैफलीत रंग भरले. अत्रे कट्टय़ाच्या कार्यकर्त्यां आणि नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘सत्पात्री दान’ या पुस्तकाच्या लेखिका संपदा वागळे यांनी आभार मानले.
भाग्यश्री प्रधान
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा