सूर-ताल आपल्याला नेहमीच मंत्रमुग्ध करतात. मनातील भावना आपल्यासमोर सुरांच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. अशाच काही आठवणी, गप्पा आणि निरागस सुरांचे संमेलन डोंबिवलीकरांना रविवारी सायंकाळी सुयोग सभागृहात अनुभवता आले. निमित्त होते बाबूजी अर्थातच सुधीर फडके यांच्या १५ व्या स्मृतिदिनाचे.
डोंबिवलीतील सुधीर फडके स्मृती समितीतर्फे ‘नादलुब्ध-गानलुब्ध’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सारेगमप लिटिल चॅम्पसमधून मराठी घराघरात पोहोचलेल्या मुग्धा वैशंपायन हिने सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तिच्या सुरेल गायनाने रसिकांचे कान तृप्त झाले. शास्त्रीय आणि सुगम दोन्ही प्रकारचे गायन प्रकार या नव्या दमाच्या गायिकेने तितक्यात ताकदीने सादर केले. सुयोग सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर तळमजल्यावरील सभागृहात दृक्श्राव्य माध्यमाची व्यवस्था करण्यात आली होती. तळमजल्यावरील सभागृहातही प्रचंड गर्दी झाली होती. शास्त्रीय संगीताच्या सत्रात मुग्धाने पुण्यकाशी आणि श्याम कल्याण हे राग सादर केले. तिने आलाप घ्यायला सुरुवात केल्यानंतर साऱ्या सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट ऐकू येत होता. सुगम संगीताच्या पर्वात आनुया धारप यांनी मुग्धाशी थोडय़ा गप्पाही मारल्या. रसिकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे आपण भारावून गेल्याचे ती यावेळी म्हणाली. कर्करोगाने ग्रस्त असलेली एक पन्नास वर्षीय महिला मुग्धाचे गाणे ऐकून उपचारांना सामोरे जायची. आपल्या सुरांमुळे कुणालातरी धीर मिळतोय, हे ऐकून खूप समाधान वाटते, अशा शब्दांत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. ‘सारेगमप’च्या काळातील आठवणीही तिने जागवल्या. त्यादरम्यान लता दीदींची भेट झाली. त्यांच्याशी बोलायला मिळाले, हा आपल्या आयुष्यातील भाग्याचा क्षण असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर एक वर्षांने पुन्हा लता दीदी भेटल्या. तेव्हाही त्यांनी लक्षात ठेवून अगदी नावानिशी माझी विचारपूस केली, यापेक्षा आनंददायी दुसरे काहीच असू शकत नाही, असेही मुग्धाने सांगितले. ‘लता दीदीपण तुझ्यासारखीच दिसायची आणि अशीच गायची ही हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेली पावती माझ्यासाठी सगळ्यात मोठी होती असेही ती म्हणाली. रूपारेल महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत असलेल्या मुग्धाला अजूनही शाळेचे दिवस आठवतात. ‘सारेगमप’च्या वेळी शाळेने खूप सांभाळून घेतले, त्याबद्दल मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांची मी कायम ऋणी राहीन, असेही तिने नमूद केले.
अलिबागजवळील खानाव हे तिचे मूळ गाव. गावातील विहिरीत पोहायला मला खूप आवडते, असेही गप्पांच्या ओघात तिने सांगितले. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे मुग्धाचे शास्त्रीय संगीत शिक्षक निषाद बाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यामुळे सरांबद्दल काय सांगशील असे विचारल्यानंतर तिने सरांबद्दल बोलायला मी काही मोठी नाही, असे नम्रपणे सांगितले. मी जी कला आता सादर केली, त्या कलेमध्ये काही चुकलं तर ते माझे आणि आवडले असेल ते गुरूंचे असे उद्गार तिने काढले. त्यावेळी साऱ्या प्रेक्षागृहात टाळ्यांचा गजर झाला. यावेळी मुग्धाने हे सुरांनो चंद्र व्हा, विष्णूमय जग, ने मजसी ने हे बाबूजींच्या चालीतले गाणे आणि अगा वैकुंठाच्या राया ही गाणी सादर केली. अभय दातार (तबला), सुंधांशु घारपुरे (संवादिनी) यांनी मैफलीत सुरेख साथ केली. यावेळी स्वरतीर्थ शिष्यवृत्ती स्वप्निल भिसे, अमृता लोखंडे, रेश्मा कु लकर्णी, पूर्वा बापट या कलाकरांना प्रदान करण्यात आली. यावेळी रसिकांनी मुग्धाला ‘छडी लागे छम छम’ या गाण्याची फर्माईश केली. मात्र वेळेअभावी हे बालगीत तिला सादर करता आले नाही. रात्री साडेनऊपर्यंत सुरू असलेली ही मैफील कधी संपूच नये असे वाटत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा