वसंत म्हणजे चैत्राची चाहूल, थंडगार पन्ह्याचा गोडवा आणि कोकिळेचे कुंजन. कोकिळेच्या फक्त आठवणीनेही मनाच्या अंगणात सुरांचा पाऊस सुरू होतो. रिमझिमणरे हे सूर रसिक मनांच्या सांदीकोपऱ्यात सदैव घर करून असतात. डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली काही वर्षे नित्यनेमाने वसंतोत्सवाच्या निमित्ताने सुरेल मैफलींचे आयोजन करून रसिक मनांच्या तारा छेडते. यंदाही गेल्या आठवडय़ात त्याचा पुनर्प्रत्यय आला. टिळकनगर शाळेच्या प्रांगणात वसंतोत्सवाच्या मैफली विलक्षण रंगल्या.
यंदा वसंतोत्सवात रसिकांच्या कानात कायम रुणझुणणाऱ्या परिचित सुरांचा आढावा स्वरसंचित या विशेष मैफलीद्वारे घेण्यात आला. बडे गुलामअली खाँ, अमिर खाँ, पं. कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे, पं.जीतेंद्र अभिषेकी, पं. किशोरी आमोणकर, नसरत फतेअली खान, सुधीर फडके, ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदी गायकांच्या गायकीचा आढावा या मैफलीत घेण्यात आला. झनक झकन पायल बाजे, पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, येऊ कशी घन:श्याम, देव देव्हाऱ्यात नाही, क्षण आला भाग्याचा आदी गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. विश्वजीत बोरवणकर, उर्मिला धनगर, मधुरा कुंभार, कनकश्री भट या कलाकारांच्या सूर आणि शब्दांनी तल्लीन झालेल्या श्रोत्यांनी शब्द आणि भावनांप्रमाणेच पन्ह्याच्या आंबट-गोडपणाचा आणि आंबेडाळीचा आस्वाद घेतला.
मराठी भावगीतांच्या रचनेला ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने विनायक जोशी यांनी मराठी भावगीतांची ९० वर्षांची परंपरा रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वरभावयात्रा या कार्यक्रमाद्वारे वसंतोत्सवाचे दुसरे पुष्प गुंफले. यावेळी एखाद्याचे स्वागत करण्यासाठी जशी कमान तयार करतात त्याचप्रमाणे रसिकांचे स्वागत करण्यासाठी जणू काही शब्द आणि स्वरांच्या मदतीने संगीताची कमानच उभारली आहे की काय याचा भास झाला. मराठी भावसंगीताचा हा पट रंजना जोगळेकर आणि रवींद्र साठे आदी कलावंतांनी उलगडून दाखविला. ध्वनीमुद्रित निघाल्यापासून ९० वर्षांचा आढावा या कार्यक्रमाद्वारे घेण्यात आला. भालचंद्र पेंढारकरांची नातसून असणाऱ्या नीलाक्षी पेंढारकर यांनी पिलू रागातील ‘हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला’ हे गाणे गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर रंजना जोगळेकर यांनी माघाची थंडी, पुन्हा स्मरशील ना तसेच विनायक जोशी आणि रंजना जोगळेकर यांनी विंदा करंदीकर यांनी शब्दबद्ध केलेले ‘देणाऱ्याने देत जावे’ हे गाणे सादर केले आणि रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. गायक उत्तम असले की वादकही आपली कला अगदी मनापासून सादर करतात. गायक वादकाच्या वादनाला दाद देतात, तशीच दाद वादकही आपल्या गायक साथीदाराला देत असतो. याचा प्रत्यक्ष अनुभव रसिकांनी यावेळी अनुभवला. दिगंबर मानकर, संदीप मयेकर, उदय चितळे आदी वादक कार्यक्रमात सहभागी झाले होते. डोंबिवलीला सांस्कृतिक उपराजधानी का म्हणतात, हे या मैफलीचा आस्वाद घेताना आला. या शहरात अनेक दिग्गज कलावंत आहेत. वसंतराव अजगावकर त्यापैकीच एक. त्यांचे ‘आली कुठूनसी कानी’ हे त्यांचे गाणे त्यांच्याच तोंडून ऐकण्याचा दुग्धशर्करा योग येथे जूळून आला. जुन्या पिढीतील या कलावंतांसोबत नवीन पिढीतील रेश्मा कुलकर्णी आणि मानसी जोशी या कलावंतांनीही या मैफलीत गाणी सादर केली. समीरा गुर्जर-जोशी यांनी केलेल्या बहारदार सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली.
वसंतमहोत्सवाचे तिसरे पुष्प संताच्या अभंगवाणीला अर्पण केले होते. पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या स्वरांच्या भक्तीमुळे रसिकही भक्तीरसात न्हाऊन गेले होते. संतानी भगवद्गीतेचे सार आपल्याला कळावे यासाठी मराठीत रचना केली. देवाची स्तुती आणि मनोभावे पूजन कसे करावे याचे जणू काही प्रात्यक्षिकच त्यांनी त्यांच्या सुरातून रसिकांना दाखवून दिले. पुरीया धनश्री रागाने त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर ‘रूप तुझे देवा दाखवी केशवा’ या स्वरूपानंदाच्या गाण्याने अभंगवाणीची सुरुवात केली आणि उपस्थित सारे रसिकजन नामस्मरणात तल्लीन झाले. ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’, ‘रूप पाहता लोचनी’,‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ आदी गाणी त्यांनी सादर केली. शंतनु शुक्ला यांनी (तबला) तर संतोष घंटे यांनी (संवादिनी) त्यांना अतिशय सुरेख साथ दिली. विशेष म्हणजे जयतीर्थ मेवुंडी त्यांच्या वादनालाही दाद देत होते. उत्तम रसिक असेल तर कलाकाराची कला अधिक खुलते याचा अनुभव येथे आला. काही डोंबिलीकरांनी शाळेच्या प्रागंणात उभे राहूनच कार्यक्रमाची अनुभूती घेतली.

Story img Loader