अंबरनाथमधील ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’मध्ये संगीतासह चित्र, व्यंगचित्र, शिल्प आणि खाद्य मेजवानी

अंबरनाथ : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांनी यंदाचा अंबरनाथ ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’ गाजवला. तीन दिवस चाललेल्या या ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’ मुख्य कार्यक्रमात विख्यात सतारवादक नीलाद्री कुमार, पाश्र्वगायिका अलका याज्ञिक आणि इंडो-पॉप संगीताची सम्राज्ञी, मराठमोळ्या शाल्मली खोलगडे यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. संगीतासह चित्र, व्यंगचित्र, शिल्प व खाद्य मेजवानीही उपस्थितांना मिळाली. त्यामुळे या महोत्सवात गायनासह सूर, ताल आणि नृत्याचे मनोहारी दर्शन रसिकांना झाले.

शिव मंदिर ही अंबरनाथ शहराच्या संस्कृती पुरातन खूण आहे. ही खूण आगामी पिढय़ांच्या मनावर बिंबविण्यासाठी गेली काही वर्षे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महोत्सवाच्या आयोजनाची सूचना केली होती. त्यावर तात्काळ अंमल करीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी अंबरनाथ शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हलला केली. या महोत्सवामुळे अंबरनाथ शहरातील प्राचीन शिव मंदिराच्या शिवरात्री उत्सवाला आणि जत्रेला कलेची जोड मिळाली. या महोत्सवामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत क्षेत्रातील कलाकार, प्रसिद्ध चित्रकार, व्यंगचित्रकार, शिल्पकार, खाद्य क्षेत्रातील अभिनव प्रयोग अंबरनाथ आणि आसपासच्या शहरातील कला रसिकांना अनुभवता आला आहे. चित्रकला क्षेत्रातील जागतिक दर्जाचे चित्रकार, व्यंगचित्रकार, शिल्पकार यांनीही नवी भर घातली. चित्र आणि शिल्पकलेच्या रसिकांनी त्यांच्या चित्रांना आणि शिल्पांना भेट देत दाद दिली.  मंचावर सुरू असलेल्या संगीत कार्यक्रमातील कलाकाराचे चित्र मंचासमोरच चित्रकार रेखाटत होते. यात विविध शिल्पांसह भारताच्या वीर जवानाचे शिल्प साकारण्यात आले होते. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट व्यंगचित्रांच्या माध्यमातून उलगडण्यात आला.

‘झतार’ वादन

शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलची सुरुवात प्रसिद्ध सतारवादक पद्मश्री नीलाद्री कुमार आणि त्यांच्या फ्यूजन बॅण्डच्या सादरीकरणाने झाली. भारतीय शास्त्रीय संगीतातील रागापासून सुरुवात करीत बॉलीवूडच्या प्रसिद्ध गाण्यांपर्यंतच्या संगीताला या वेळी नीलाद्री कुमार यांनी हात घातला. नीलाद्री कुमार यांनी तयार केलेल्या गिटार आणि सतार यांचा संयोग असलेल्या ‘झतार’ या वाद्याने उपस्थित रसिकांची मने जिंकली. ‘झतार’च्या छेडलेल्या तारांमधून निघणारे स्वर, त्याला विजय घाटे यांच्या तबल्याची मिळणारी साथ आणि पाश्चिमात्य ड्रमसेट आणि जेम्बे वाद्याची जोड यामुळे एक वेगळीच सांगीतिक पर्वणी अंबरनाथकरांना अनुभवता आली.

दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि लोकसत्ता माध्यम प्रायोजक असलेल्या शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमधून या वेळी रसिकांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी मिळाली. १ मार्चपासून सुरू झालेल्या या महोत्सवात सुप्रसिद्ध सतारवादक पद्मश्री निलाद्री कुमार, बॉलीवूडच्या प्रसिद्ध पाश्र्वगायिका अलका याज्ञिक आणि भारतीय संगीताला विदेशी झालर देणारी मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडे यांनी हजेरी लावली होती. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यातील शहिदांना तीनही दिवस श्रद्धांजली वाहण्यात आली. तर तीन दिवस माजी लष्करी अधिकारी, वीरपत्नी यांचा गौरव करण्यात आला.

‘तेजाब’, ‘बाजीगर’मुळे बहार

दुसऱ्या दिवशी अलका याज्ञिक यांनी १९९० मध्ये आलेल्या चित्रपटांतील गाणी गाऊन आठवणींना उजाळा दिला. ‘पालखी में हो के सवार चली रे’ ते ‘कभी खुशी कभी गम’ गाणी गायली. तेजाब आणि बाजीगरमधील त्यांच्या गाण्यांनी तर धम्माल उडवून दिली. त्यांनी अलीकडे गायलेल्या ‘अगर तुम साथ हो’ आणि ‘दिलबर दिलबर’ या गाण्यांचाही त्यात समावेश होता. याज्ञिक यांच्या गायनाने तीन पिढय़ांमधील रसिकता या निमित्ताने बहराला आली होती.

शाल्मलीच्या सुरांवर तरुणाईचा ठेका

शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या शेवटच्या सत्रात शाल्मली खोलगडे हिच्या हिंदी पॉप गाण्यांनी धम्माल उडवून दिली. हिंदी पॉप गाणी गाण्याच्या शैलीसह शाल्मलीने केलेल्या नृत्यावर तरुण-तरुणींनीही ठेका धरला. ‘मैं परेशान परेशान’ या गाण्याने शाल्मलीने सुरुवात केली. त्यानंतर ‘उर्वशी.. उर्वशी’, ‘हम्मा हम्मा’, ‘बँग बँग’ या गाण्यासोबत मराठीतल्या ‘फ्रेश, ‘हे मन माझे’ या गाण्यालाही रसिकांनी जोरदार दाद दिली. गिटारच्या साथीने शांत चालीच्या ‘इंना सोना तेनु रबने बनाया’ आणि ‘दिल दि या गल्ला’ ही गाणी शाल्मलीने सादर केली.

Story img Loader