मराठी भाषेतील साहित्यसंपदा समृद्ध करण्यात ज्यांचे मोठे योगदान आहे, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याच रचनांद्वारे डोंबिवलीकरांनी आदरांजली वाहिली. त्याला सुरांचीही सुरेख साथ लाभली. ‘भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा’ या कविश्रेष्ठ पाडगांवकरांच्या काव्यपंक्तींची प्रचीती यानिमित्ताने रसिकांना आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची गाणी श्रीरंग भावे आणि केतकी भावे-जोशी यांनी अतिशय तयारीने सादर केली. त्याला ज्येष्ठ लेखक दुर्गेश परूळकर यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाची जोड मिळाली. श्रोत्यांनीही बहुसंख्येने उपस्थित राहून या मैफलीस दाद दिली.
शनिवारी सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून संस्कार भारती, तन्मय केतकर आणि ओमकार गांगल यांनी ‘स्वतंत्रते भगवती’ या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली पूर्व येथील सर्वेश हॉलमध्ये केले होते.
अचूक अर्थवाही शब्दांना जर स्वरांची साथ असेल तर अतिशय सुरेख गीत तयार होऊन ते रसिकांच्या मनाचा ठाव घेते. या मैफलीत क्षणोक्षणी रसिक श्रोते त्याचा अनुभव घेत होते. स्वातंत्र्यवीर सावकरांच्या चतुरस्र प्रतिभेचा आविष्कार मैफलीत एकामागून एक होऊ लागला आणि रसिकांची ब्रह्मानंदी टाळी लागली. कारण सुरांच्या साथीने शब्दांमधील नेमके भाव प्रकट होत होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास होता. त्यामुळे अर्थातच त्यांच्या अनेक काव्यपंक्तींमधून स्वातंत्र्याविषयाच्या भावना व्यक्त झाल्या आहेत. ती सारी गाणी एकामागून एक ऐकायला मिळणे हा रसिकांच्या दृष्टीने दुर्लभ योग होता.
‘जय देव जय देव जय जय शिवराया’, ‘ऐश्वर्य भारी, छंद नसे चांगला’, ‘सकाळीच त’ू, जयोस्तुते, ने मजसी ने, अखिल हिंदू विजयध्वज आदी सावरकरांनी शब्दबद्ध केलेली गाणी यावेळी सादर झाली. यावेळी त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक गाण्यामागचा इतिहास जागा झाला. भारताला भूगोल आहे परंतु माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे हे त्यांचे उद्गार अगदी सहज आठवले. सर्वसाधारणपणे अशा मैफलींना प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांची बहुसंख्या असते. मात्र या मैफलीचे विशेष म्हणजे तरुणांनीही मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. स्वातंत्र्यवीरांना मराठी भाषेला अनेक नवे शब्द दिले. अर्थसंकल्प, उपस्थित, क्रमांक, क्रीडांगण, चित्रपट, स्तंभ, दिग्दर्शक, त्वरित,नगरपलिका आदीसारख्या अनेक रोजच्या जीवनातील शब्दांना त्यांनी जन्माला घातले. इतकेच नव्हे तर काव्यांमध्ये गोमांतक, सप्तर्षी,कमला, कुसुमसंचय तर नाटक क्षेत्रातही त्यांनी संगीत उ:शाप, संगीत उत्तरक्रिया यासारख्या संहिता लिहून मोठे योगदान दिले होते, त्याची आठवणही परूळकर यांनी करून दिली. एकीकडे शब्दसुरांची ही मैफल सुरू असताना दुसरीकडे चित्रकार मुकेश चौधरी कॅनव्हॉसवर स्वातंत्र्यवीरांचे चित्र रेखाटत होते.
भाग्यश्री प्रधान
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा