संगीत आणि साहित्य यांचा मिलाफ करून उभारणी * वाद्यांच्या मोठय़ा प्रतिकृती

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नववर्षांनिमित्त मीरा भाईंदर महापालिकेकडून नागरिकांना ‘संगीत उद्याना’ची भेट देण्यात आली आहे. साहित्य आणि भारतीय संगीत याचे सूत्र धरून मीरा रोड येथे साकारण्यात आलेले हे उद्यान नागरिकांसाठी नुकतेच खुले करण्यात आले आहे.

साहित्य आणि संगीत या कला भारतीयांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. या दोन्ही कलांचा खुबीने वापर केलेले उद्यान मीरा रोड येथे साकार झाले असून हे उद्यान सध्या नागरिकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. मीरा रोड येथील उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर उद्यान विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला; परंतु उद्यानाला इतर उद्यानांसारखे स्वरूप न देता उद्यानाची वेगळी ओळख निर्माण व्हावी या दृष्टीने हे उद्यान तयार करण्यात आले आहे. संगीताचा मानवी जीवनावर मोठाच प्रभाव पडत असतो. हाच धागा पकडून महापालिकेने संगीत वाद्यांच्या प्रतिकृती उद्यानात उभारल्या आहेत. उद्यानाच्या प्रवेशद्वाराशीच भव्य बासरीची प्रतिकृती आपले स्वागत करते. छोटय़ाशा कारंज्यात या बासरीची   प्रतिकृती स्थानापन्न करण्यात आली आहे. सतार, हार्मोनियम आणि तबला ही वाद्ये भारतीय अभिजात संगीताचा आत्मा आहेत. त्यांच्या भव्य प्रतिकृतीदेखील या उद्यानात मांडण्यात आल्या आहेत.महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांची ‘बटाटय़ाची चाळ’ ही अजरामर साहित्यकृती.उद्यानाच्या मध्यभागी रंगमंच तयार करण्यात आला असून रंगमंचाच्या भिंतींवर बटाटय़ाची चाळ चित्ररूपाने साकारण्यात आली आहे. बटाटय़ाच्या चाळीतील सर्व पात्रे चित्ररूपाने आपल्या भेटीस आली असल्याचा अनुभव हा रंगमंच देऊन जातो. याशिवाय बच्चेकंपनीलादेखील खूश करण्याचा प्रयत्न उद्यानात करण्यात आला आहे. छोटा भीम, मिकी माऊस, डोनाल्ड डक ही मुलांसोबत मोठय़ांमध्येही लोकप्रिय असलेली कार्टून्सची चित्रे उद्यानात आपल्या स्वागतासाठी उभी असलेली दृष्टीस पडतात. रात्रीच्या वेळी प्रकाशझोतात या उद्यानाचे सौंदर्य अधिकच खुलत असून नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. लवकरच या वाद्यांची मंद अशी सुरावटही नागरिकांना ऐकू येईल अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

उद्यानाची वैशिष्टय़े

* बासरी, सतार, हार्मोनियम आणि तबला या संगीत वाद्यांच्या प्रतिकृती

* उद्यानाच्या मध्यभागी रंगमंच

* रंगमंचाच्या भिंतींवर ‘बटाटय़ाची चाळ’ चित्ररूपाने साकारण्यात आली आहे

* छोटा भीम, मिकी माऊस, डोनाल्ड डक या कार्टून्सची चित्रे

* रात्रीच्या वेळी प्रकाशझोत

* लवकरच या वाद्यांची मंद अशी सुरावटही नागरिकांना ऐकू येईल अशी व्यवस्था

उद्यानात कसे जाल?

गोल्डन नेस्ट ते काशिमीरा या मुख्य रस्त्यावरून दीपक हॉस्पिटल सिग्नलजवळ डावीकडे वळायचे. सेव्हन इलेव्हन रुग्णालयापाशी सरळ गेल्यानंतर पुन्हा डावीकडे वळायचे. रुग्णालयाला लागूनच उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Musical instruments reflection in mira road garden