नाटय़संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांचे मत
‘‘नवोदित तरुण कलाकारांना वेगवेगळ्या विषयांची जाण आहे. सातत्याने प्रयत्न करत राहा. अपयश पदरी पडले तरी एखाद्या पराभूत राजाप्रमाणे तुमचे वागणे असायला हवे. पराजयातूनही आत्मविश्वास अधिक बळावेल अशी कृती करा,’’ असा सल्ला अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी आमदार चषक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये तरुण कलाकारांना दिला. ‘कोकण कला अकादमी’ आणि ‘संस्कार’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार चषक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी सोमवारी गडकरी रंगायतन येथे झाली.
कोकणातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुरू झालेली कोकण कला अकादमी संस्था दहा वर्षे टिकून आहे. यानंतरही ही संस्था टिकून राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना गवाणकर यांनी काही आठवणी सांगितल्या. ठाण्यातील दिवा येथे बालपण गेले. त्या ठिकाणी राहून नाटक जोपासले. वाचनासारखी भौतिक भूक ठाणे शहराने आणि या शहरातील ग्रंथालयांनी पुरवली. ठाण्यात होणाऱ्या ९६ व्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्याचा अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. आमदार संजय केळकर, लेखक अशोक समेळ, कोकण कला अकादमीचे प्रदीप ढवळ आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

’आमदार चषक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मुंबई, पुणे, रत्नागिरी, विरार आणि ठाणे येथील सहा एकांकिकांची निवड करण्यात आली होती.
’ज्ञानसाधना महाविद्यालयाची ‘मित्तर’ ही एकांकिका प्रथम, महर्षी दयानंद महाविद्यालयाची ‘बत्ताशी’ ही एकांकिका द्वितीय, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची ‘भोग’ तृतीय क्रमांक आणि विवा महाविद्यालयाची ‘वी द पिपल’ ही एकांकिका उत्तेजनार्थ ठरली.
’दिग्दर्शक मंदार देवस्थळी, कवी अशोक बागवे आणि अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

रंगभूमी लयास जाते की काय असे वाटत असतानाच आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी यांच्यासारखे कलाकार जन्माला आले. नवोदित तरुणांमध्येही असे भावी कलाकार घडतील.
– गंगारामा गवाणकर.

Story img Loader