नाटय़संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांचे मत
‘‘नवोदित तरुण कलाकारांना वेगवेगळ्या विषयांची जाण आहे. सातत्याने प्रयत्न करत राहा. अपयश पदरी पडले तरी एखाद्या पराभूत राजाप्रमाणे तुमचे वागणे असायला हवे. पराजयातूनही आत्मविश्वास अधिक बळावेल अशी कृती करा,’’ असा सल्ला अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी आमदार चषक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये तरुण कलाकारांना दिला. ‘कोकण कला अकादमी’ आणि ‘संस्कार’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार चषक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी सोमवारी गडकरी रंगायतन येथे झाली.
कोकणातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुरू झालेली कोकण कला अकादमी संस्था दहा वर्षे टिकून आहे. यानंतरही ही संस्था टिकून राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना गवाणकर यांनी काही आठवणी सांगितल्या. ठाण्यातील दिवा येथे बालपण गेले. त्या ठिकाणी राहून नाटक जोपासले. वाचनासारखी भौतिक भूक ठाणे शहराने आणि या शहरातील ग्रंथालयांनी पुरवली. ठाण्यात होणाऱ्या ९६ व्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्याचा अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. आमदार संजय केळकर, लेखक अशोक समेळ, कोकण कला अकादमीचे प्रदीप ढवळ आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा