ऊर्जा फाऊंडेशन, डोंबिवली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नुकत्याच पार पडलेल्या ‘माझा प्लास्टिक कचरा ही माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत ऊर्जा फाऊंडेशनने कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि ठाणे अशा विविध भागांमधून प्लास्टिकचे संकलन केले. आजवर मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि जवळील अनेक उपनगरांतून प्लास्टिक कचरा ऊर्जा फाऊंडेशनपर्यंत पोहोचवला जात आहे. उपनगरी रेल्वे गाडय़ांमधील काही समविचारी महिलांनी मिळून ३ जुलै २०१५ रोजी ऊर्जा फाऊंडेशन सुरू केले. या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. गो ग्रीन, शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना मदत, गतिमंद मुलांच्या संस्थांना मदत, महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे असे अनेक उपक्रम संस्था राबविते. या सकारात्मक उपक्रमांविषयी.
समविचारी महिलांचा एल्गार
२००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये मुंबई परिसराचे जनजीवन ठप्प झाले होते. अतिवृष्टी नैसर्गिक असली तरी त्यामुळे उद्भवलेल्या परिणामांना मुख्यत: इतस्तत: टाकलेला आणि साचून राहिलेला कचरा मुख्यत: कारणीभूत होता. कचऱ्यातील प्लास्टिक ही सर्वात मोठी डोकेदुखी असते. पुरामुळे मुंबई आणि उपनगरांची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. या वेळी या संस्थेच्या अनेक महिला विविध ठिकाणी अडकल्या होत्या. प्लास्टिक हे अनेक समस्यांच्या मुळाशी आहे. त्यामुळे प्लास्टिक निर्मूलनासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय या काही समविचारी महिलांनी घेतला.
वापरलेले प्लास्टिक कचऱ्यात फेकले जाते. असे प्लास्टिक गोळा करून त्यावर पुन:प्रक्रिया करणे अथवा त्याचा पुनर्वापर करणे यासाठी ‘वापर-पुनर्वापर आणि पुनप्र्रक्रिया’ या त्रिसूत्रीवर आधारित ‘माझा प्लास्टिक कचरा ही माझी जबाबदारी’ ही मोहीम ऊर्जा फाऊंडेशन अनेक शहरांमध्ये राबवत आहे.
दूध, धान्य अशा दररोजच्या वापरातील वस्तूंसाठी प्लास्टिकचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. ते सर्व प्लास्टिक कचऱ्यात टाकले जाते. कचरावेचक अथवा भंगारवाले त्यांना उपयोगी पडणारे प्लास्टिकच गोळा करतात. अन्य प्लास्टिक कचऱ्यात तसेच पडून राहते. त्यामुळे प्लास्टिक संकलित करून ते थेट पुनर्वापर अथवा पुनप्र्रक्रियेसाठी देण्याची मोहीम ऊर्जा फाऊंडेशनने हाती घेतली आहे.
महापालिकेतर्फे डोंबिवलीतील कोणवाडा परिसरात या संस्थेला प्लास्टिक जमा करण्यासाठी जागा देण्यात आली आहे. ४० दिवसांतून एकदा प्लास्टिक संकलनाचा उपक्रम आयोजित केला जातो. हा साठवलेला कचरा जेजुरी येथे पाठवला जातो. जेजुरीतील रुद्र एन्व्हरायन्मेंटल या कंपनीद्वारे या संकलित प्लास्टिकचे विघटन केले जाते. विघटित केलेल्या प्लास्टिकमधून पॉलीप्युअल नावाचे इंधन मिळवले जाते. या इंधनाचा वापर येथील औद्योगिक कंपन्यांमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या गावांमध्ये रॉकेलऐवजी या इंधनाचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जात आहे.
आत्तापर्यंत ऊर्जा फाऊंडेशनने १३ अभियानांत गेल्या वर्षभरात डोंबिवली आणि ठाणे येथून २४ टन प्लास्टिक कचरा जमा करून जेजुरी येथे पाठविला आहे. थोडक्यात तितके प्लास्टिक कचराभूमीवर जाण्यापासून त्यांनी वाचविलेले आहे. अनेक शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था यांच्याबरोबर एकत्र काम करून प्लास्टिक-त्रिसूत्री ‘रीडय़ुस, रीयुज, रीसायकल आणि रीफ्युज’ असा आम्ही वारंवार प्रचार करतो, असे ऊर्जाचे प्रतिनिधी सांगतात.
ऊर्जा फाऊंडेशन ही संस्था प्लास्टिक संकलनाव्यतिरिक्त शैक्षणिक ज्ञानयज्ञ उपक्रमांतर्गत वाडा आणि शहापूर तालुक्यामधील तुसे आणि पिवळी या खेडय़ांतील शाळांमधील विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके, वह्य़ा, उत्तरपत्रिका, बारकोडस, होलोग्राम्स, गाईड्स, अपेक्षित प्रश्नसंच उपलब्ध करून देते. खेडय़ांमधल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रयोगशाळेची उपकरणे या उपक्रमाअंतर्गत पुरविली जातात.
उटणे प्रकल्प, कापडी पिशव्या शिलाई याद्वारे स्वयंरोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न संस्थेद्वारे केला जात आहे. आर्थिक नियोजनामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी मार्गदर्शन, ‘मल्टिपर्पझ पाऊचेस’ची निर्मिती करून स्त्रियांना रोजगार उपल्ब्ध करून देण्याचे काम ऊर्जा फाऊंडेशन करते. अपंगालय व वृद्धाश्रमांना आर्थिक तसेच कपडे, धान्यांची मदत, वृद्धांशी संवाद साधणे, मतिमंद मुलांच्या संस्थेला भेट देणे, त्यांच्याबरोबर गप्पागोष्टी, गाणी म्हणणे अशा प्रकारचे उपक्रम ऊर्जा फाऊंडेशनतर्फे राबविले जातात.
सायली रावराणे : sayli.rane18@gmail.com