पूर्वा भालेकर
ठाणे – परिवहन सेवेतील प्रवाशांचा सुट्ट्या पैशाचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण केलेले माझी टीएमटी हे ॲप केवळ घोषणाच आहे का असा सवाल प्रवाशांकडून विचारला जाऊ लागला आहे. लोकार्पणाच्या वेळी हे ॲप काही बसमार्गावर सुरु करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते. परंतू, प्रत्यक्षात कोणत्याही मार्गावर ही सुविधा अद्याप सुरु झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. वाहक आणि चालकांना या ॲपचा वापर कशाप्रकारे करावा याचे प्रशिक्षण देण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे ॲप कार्यान्वित होण्यास अजून दोन ते तीन महिन्याचा कालावधी जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
ठाणे शहरातील विविध भागात परिवहन सेवेच्या बस गाड्या धावतात. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रवाशी तिकीट काढताना वाहकांकडून त्यांना वारंवार सुचना देण्यात येत असते की, तिकीटासाठी सुट्टे पैसे द्यावे. परंतू, अनेकदा प्रवाशांकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये खटके उडताना दिसून येतात. यावर पर्याय म्हणून डिजीटल तिकीट सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी प्रवाशांकडुून केली जात होती.
हेही वाचा >>>ठाणे, पालघरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ‘जिजाऊ’ संघटना
त्यानुसार, अखेर ठाणे महापालिका परिवहन विभागाने ‘माझी टीएमटी’ या ॲपची निर्मिती केली. परंतू, या ॲपमध्ये संपूर्ण माहिती समाविष्ट नसल्यामुळे अद्याप प्रवाशांना या ॲपचा वापर करता येत नसल्याची माहिती समोर आली आहे. या ॲप्लिकेशनचा वापर करण्यासाठी वापरकर्त्याला त्याचे नाव, ई-मेल आयडी आणि दुरध्वनी क्रमांक समाविष्ट करुन नोंद करावी लागते. परंतू, या ॲप्लिकेशनवर ही सर्व माहिती समाविष्ट करुनही हे ॲप सुरु होत नसल्याची तक्रार काही प्रवाशांनी दिली आहे. या ॲप्लिकेशनचे लोकार्पण आचारसंहिता लागण्याच्या भितीमुळे घाईघाईत केले का असा प्रश्नही प्रवासी वर्गाकडून विचारला जाऊ लागला आहे. या ॲप्लिकेशनच्या लोकार्पणावेळी काही बसमार्गावर या ॲपद्वारे तिकिटांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, असे ठाणे परिवहन व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ही सेवा कोणत्याही मार्गावर सुरु झालेली नसल्याचे दिसून येत आहे. हे ॲप कार्यान्वित होण्यास अजून दोन ते तीन महिन्याचा कालावधी जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
हेही वाचा >>>ठाण्यात उद्यापासून प्रचाराची रणधुमाळीला सुरूवात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव अर्ज भरणार
या ॲपचा वापर कसा होईल ?
या मोबाईल ॲपद्वारे प्रवाशांना यूपीआय वापरून डिजिटल तिकिट काढता येणार आहे. तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंगचा वापर करून पैसे भरता येतील. त्याचप्रमाणे, प्रवाशांना बस कोठे आणि किती वेळेत बस थांब्यावर येणार याची माहिती देण्याची सुविधाही या ॲपमध्ये आहे. प्रवाशांना ॲपवर प्रवासाच्या सुरुवातीचे ठिकाण आणि गंतव्य स्थान यांची माहिती भरून बसमार्ग, त्या मार्गावरील उपलब्ध बसगाड्या, त्यासाठी लागणारे तिकिट भाडे याचीही माहिती मिळणार आहे.
या संदर्भात ठाणे परिवहन विभागाती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी ॲप्लिकेशनवर नोंदणी करताना प्रवाशांना ज्या तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत, त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती दिली. परंतू, हे ॲप्लिकेशन सध्या कोणत्या मार्गावर सुरु करण्यात आले आहे, याची विचारणा केली असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. येत्या काही दिवसात हे ॲप्लिकेशन सर्व मार्गांवर सुरु होईल केवळ इतकीच प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आली.