मित्रांसोबत चंदेरी गडावर फिरायला गेलेल्या अंकित राजू महाडीक (२३) या तरुणाचा नवीन पनवेल येथे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी अंकितच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त करत त्याच्या वडिलांनी  सखोल चौकशीची मागणी केली आहे.
अंकित हा आपल्या महाविद्यालयातील चार मित्रांसोबत रविवारी १४ जून रोजी चंदेरी गडावर फिरायला गेला होता. मात्र वाटेतच त्याला धाप लागल्याने तो एका ठिकाणी बसला होता. त्यावेळी त्याचे इतर मित्र पुढे निघून गेले. हे सर्व जण त्या ठिकाणी परतले असता त्यांना अंकित आढळला नाही. तो खाली उतरला असावा, असे समजून तेही खाली उतरले. मात्र, अंकितच्या घरी चौकशी केली असता तो परतला नसल्याचे उघड झाले. त्यानंतर अंकितच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलीस तसेच अंकितचे नातेवाईक व मित्रमंडळी यांनी रात्रभर शोध घेऊनही तो सापडला नाही. मात्र,  मंगळवारी सायंकाळी अंकितचा मृतदेह नवीन पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हणजेच बदलापूरच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराच्या कपारीत पोलिसांना सापडला. डोक्याला मार लागल्याने अंकित महाडिकचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. तसेच अंकितच्या चारही मित्रांचे जबाब घेण्यात आले असून कोणताही संशायस्पद प्रकार वाटत नसल्याने या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती नविन पनवेल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी दिली. मात्र, अंकित या ठिकाणी कसा पोहोचला व त्याचा मृत्यू कसा झाला, याची उत्तरे अद्याप मिळाली नसल्याने त्याच्या वडिलांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
कला शाखेतून तृतीय वर्षांची परीक्षा देऊन अंकित नुकताच एका खाजगी कंपनीत कामाला लागला होता.  रविवारची सुट्टी असल्याने तो मित्रांबरोबर याठिकाणी ट्रेकिंगला गेला होता.

Story img Loader