आठ वर्षापूर्वी डोंबिवलीत एका रिक्षा चालकाची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या नाडर टोळीची कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.नाडर टोळीचा म्होरक्या मणीकंडन नाडर आणि त्याचे सहकारी या हत्येच्या आरोप असलेल्या प्रकरणात अटक होऊन आधारवाडी तुरुंगात होते. त्यावेळी मणीकंडन आणि त्याचे सहकारी आधारवाडी तुरुंगाच्या २० फूट उंच संरक्षित भिंतीवरुन पळून गेले होते. पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त करण्यात आलेली स्वताची मोटार शिताफीने पळून नेण्यात नाडर टोळी यशस्वी झाली होती. कल्याण, डोंबिवली परिसरात काही वर्षापूर्वी नाडर टोळीची दहशत होती.
हेही वाचा >>>कल्याण-डोंबिवलीत जुन्या निवृत्त वेतन योजनेसाठी कर्मचाऱ्यांची निदर्शने
या प्रकरणात कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात नाडर टोळीची बाजू अधिवक्ता ॲड. गणेश घोलप यांनी मांडली.ॲड. घोलप यांनी सांगितले, जून २०१५ मध्ये मानपाडा रस्त्यावरील शनी मंदिराच्या बाजुला रात्रीच्या वेळेत एका रिक्षा चालकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नाडर टोळीवर होता. पोलिसांच्या मनाई आदेश व शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका मानपाडा पोलिसांनी ठेवला होता. रिक्षा चालकाला मारण्याचा प्रयत्न करत असताना जवळील मोटार नाडर टोळी डोंबिवली परिसरात सोडून दिली होती. ती मोटार पोलिसांनी जप्त करुन पोलीस ठाण्यातील आवारात ठेवली होती. ती मोटार या टोळीने शिताफीने पळून नेली होती.
हत्येप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.१० साक्षीदारांच्या या प्रकरणात साक्षी घेण्यात आल्या होत्या.या खटल्यात पोलिसांनी लिखित स्वरुपात दाखल केलेले जखमांचे प्रमाणपत्र, मणीकंडण नाडरची अटक, पोलिसांचा तमीळनाडू दौरा यामध्ये कोणताही ताळमेळ आणि सत्यता न्यायालयाला आढळून आली नाही. नाडर टोळीचे वकील घोलप यांनी पोलिसांनी दाखल केलेल्या पुराव्यांची सत्यता जोरदार प्रतिवाद करुन खोडून काढली. तपास अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास शेंडे या घटनेच्या सत्यतेचे पुरावे सादर करू शकले नाहीत. पोलिसांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडण्यात आली. कायद्याच्या कसोटीवर ती टिकली नाही.न्यायाधीश गोरवाडे यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन सबळ पुराव्या अभावी नाडर टोळीची रिक्षा चालकाच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून आठ वर्षांनी निर्दोष मुक्तता केली.