नागला बंदर परिसरातील पर्यावरणालाच दगडखाणींचा सुरुंग; आणखी पाच वर्षे लूट सुरूच राहणार
ठाणे शहराच्या वेशीवर घोडबंदर रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नागला बंदर परिसरातील पोर्तुगीजकालीन किल्ल्याच्या अवशेषांचे जतन व्हावे म्हणून शहरातील इतिहासप्रेमी नागरिकांनी आंदोलन पुकारले असले तरी प्रत्यक्षात दगडखाणींनी काही वर्षांपूर्वीच येथील ऐतिहासिक खुणा पुरत्या उद्ध्वस्त करून टाकल्या आहेत. एवढेच नव्हे तर दगड काढण्याच्या नादात खाणमालकांनी पर्यावरणाचे सर्व नियम पायदळी तुडवून या परिसरातील डोंगररांगाही अक्षरश: कापून काढल्या आहेत. त्यामुळे दोन दशकांपूर्वी अस्तित्वात असलेला येथील डोंगर आता चक्क नाहीसा झाला असून उरल्यासुरल्या लहान-मोठय़ा टेकडय़ांचेही लचके सध्या तोडले जात आहेत.
नवी मुंबईतील दगडखाणींवर बंदी आल्यानंतर ठाणे, कल्याण, अंबरनाथ या ठिकाणी असलेल्या खाणींमधून मोठय़ा प्रमाणात दगड तसेच दगडखडीचा पुरवठा केला जाऊ लागला. खरे तर डोंगरांमधून विशिष्ट प्रमाणात दगड काढायलाच परवानगी दिली जाते. दगड काढताना तेथील पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे अपेक्षित असते. मात्र जास्तीत जास्त नफा मिळविण्याच्या हव्यासापोटी दगड खाणमालकांनी ठाणे जिल्ह्य़ातील अनेक डोंगरच गायब केले असून नागला बंदर हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. विशेष धक्कादायक म्हणजे उद्ध्वस्त करण्यासारखे आता इथे काहीही उरलेले नसतानाही एका दगडखाणीला २०२१ पर्यंत दगड काढण्याचा परवाना शासनाने दिला आहे. त्यामुळे इतिहासाचे सोडा, येथील भूगोल वाचविण्यासाठी संवेदनशील ठाणेकरांनी आवाज उठवायला हवा, असे मत एका पर्यावरणतज्ज्ञाने व्यक्त केले आहे.
..तर डोंगर वाचले असते!
‘लोकसत्ता’ने दहा वर्षांपूर्वीच नागला बंदर परिसरातील पर्यावरणाच्या लुडबुडीविषयी सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही या बातमीची दखल घेऊन ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांना परिसराची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही येथील दगडखाणी सुरूच राहिल्या. त्या वेळी जर येथील दगडखाणींना आवर घातला असता तर आता किमान डोंगर तरी वाचू शकले असते.
नागला कोट हा पोर्तुगीजकालीन किल्ला होता. २००५ पर्यंत त्याच्या काही भिंती अस्तित्वात होत्या. त्यानंतरच्या काळात येथील दगड खाणमालकांनी किल्ला उद्ध्वस्त केलाच, शिवाय येथील डोंगरच होत्याचे नव्हते करून टाकले. २५ वर्षांपूर्वी किल्ल्याची तटबंदी तसेच २० दालनांचे अवशेष होते.
– सदाशिव टेटविलकर, इतिहासतज्ज्ञ
मोठय़ा प्रमाणात हानी झाली असली तरी अजूनही नागला बंदर परिसरात पोर्तुगीजकालीन किल्ल्याचे अवशेष आहेत. त्यांचे जतन व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. दगडखाणींनी येथील डोंगरांची वाट लावली ही मात्र वस्तुस्थिती आहे. या संदर्भात संबंधितांवर गुन्हेच दाखल व्हायला हवेत.
– संजय केळकर, आमदार, अध्यक्ष, सह्य़ाद्री प्रतिष्ठान
नागला बंदर परिसरात पूर्वी अनेक दगडखाणी कार्यरत होत्या. त्यांपैकी सध्या एक दगडखाण सुरू आहे. प्रदूषण नियंत्रण तसेच शासनाच्या पर्यावरण विभागाच्या मान्यतेनुसारच इथे दगडांचे उत्खनन सुरू आहे. करारानुसार २०२१ पर्यंत इथून दगड काढण्यात येणार आहेत.
– मनोज मेश्राम, जिल्हा खनिकर्म अधिकारी, ठाणे