ठाणे : घोडबंदर येथील गायमुख भागातील खाडी किनारी भागात चौपाटी विकसित करण्यात आली असतानाच, त्यापाठोपाठ आता या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात गायमुख ते नागलाबंदर खाडी किनारा विकसित करून आरामाराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य शासनाने १५० कोटी रुपये मंजूर केले असून ठाणे महापालिकेने या कामाच्या निविदा प्रक्रीया पुर्ण करत ठेकेदाराला कामाचा कार्यादेश दिल्याने प्रकल्प कामाला महिनाभरात सुरूवात होण्याची चिन्हे आहेत. येत्या दोन वर्षात प्रकल्पाचे काम पुर्ण करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहराला ३२ किमीचा खाडी किनारा लाभला आहे. या परिसरात परदेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांसह इतर पक्षी-प्रजाती आढळतात. परंतु या भागातील पाणथळ जमिनीवर भुमाफियांकडून अतिक्रमण करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढीस लागले होते. या प्रकारांमुळे खाडी किनारी भागाचे अस्तित्व धोक्यात आले होते. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने खाडी किनारा सुशोभीकरण प्रकल्पाची आखणी करत खाडी किनारा परिसर संरक्षित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार कोपरी, कोलशेत, वाघबीळ आणि गायमुख भागात खाडी किनारा भागाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. गायमुख भागात पहिल्या टप्प्यात ५०० मीटर, दुसऱ्या टप्प्यात ८०० मीटर खाडी किनारी भागाचे सुशोभिकरण करण्यात आले. त्यापाठोपाठ आता तिसऱ्या टप्प्यात गायमुख ते नागलाबंदर असा ८०० मीटर लांबीचा खाडी परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. त्याठिकाणी आरमाराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून पालिका प्रशासनाने यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी दिली होती. या कामासाठी या कामासाठी राज्य शासनाने १५० कोटी रुपयांना निधी मंजुर केला होता. या कामासाठी पालिकेने निविदा प्रक्रीया राबवून ठेकेदार निश्चित केला होता. हे काम सुरु करण्यासाठी आवश्यक पर्यावरण खात्याची, सीआरझेडची परवानगी महापालिकेला मिळाल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचे काही दिवसांपुर्वी भुमीपुजन करण्यात आले होते. पालिके प्रशासनाने ठेकेदाराला कामाचा कार्यादेश दिला आहे. यामुळे महिनाभरात या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होणार आहे.

हेही वाचा – कल्याणच्या राधानगरमधील दररोजच्या वाहन कोंडीने प्रवासी हैराण

छत्रपती शिवाजी महाराजाच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांचा इतिहास देखील नागलाबंदर खाडी किनाऱ्याला असल्यामुळे या परिसराला ऐतिहासिक असे महत्व आहे. घोडबंदर गावात इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा दिसतात. यामुळे खाडी किनारा विकसित होत असताना नागला बंदर येथे आरमार केंद्राची प्रतिकृती उभारली जाणार असून त्यात या संपूर्ण इतिहासाची माहिती नवीन पिढीला, इतिहासप्रेमींना करून दिली जाणार आहे. तसेच नागरिकांसाठी मोठा ‘पाथ वे’, विविध प्रकारचे आकर्षक गार्डन, विसर्जन घाट, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, बसण्यासाठी वेगवेगळ्या जागा तयार केल्या जातील. शिवाय दाट झाडांचे उद्यान, हिरवेगार लॉन, पार्किंगची सुविधा, वॉक वे, खेळण्यासाठी मोकळी जागा, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा, लहान मुलांसाठी मनोरंजन क्षेत्र, व्हॉली बॉल – फुटबॉल खेळता येईल अशी जागा, आकर्षक लायटिंग, सुसज्ज जेटी, दशक्रिया घाट अशी विविध कामे येथे केली जाणार आहेत.

हेही वाचा – ठाणे : वाहतुकीचे नियमन करताना पोलिसांचाच जीव धोक्यात, सुमारे महिन्याभरात पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

ठाणे महापालिका क्षेत्रातील गायमुख तिसरा टप्पा ते नागला बंदर खाडी किनारा विकसित करून आरामाराची प्रतिकृती उभारण्याचे काम लवकरच म्हणजे पुढील महिन्यापासून सुरु होणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला आहे. खाडी किनारा विकास करत असताना येथे ‘वॉटर स्पोर्ट्स’ सुरु करण्याचाही विचार आहे. पुढील २ वर्षात हा खाडी किनारा विकास पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naglabandar bay shore beautification work started within a month the work of the project will be completed in two years ssb