लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे: भिवंडीतील नायब तहसीलदार सिंधू उमेश खाडे यांना ५० हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी रंगेहात पकडले. फेरफार हरकत नोंदणीप्रकरणाचा अंतिम अहवाल देण्यासाठी त्यांनी ही लाच घेतल्याचे समोर आले आहे.

भिवंडी येथील तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार पदावर सिंधू खाडे (५२) या कार्यरत आहेत. तक्रारदार हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्या अशीलाचे फेरफार हरकत नोंदणी प्रकरण सिंधू यांच्याकडे प्रलंबित होते. या प्रकरणाचा अंतिम अहवाल आणि त्यांची प्रत देण्यासाठी सिंधू यांनी तक्रारदाराकडे दिड लाखांच्या लाचेची मागणी केली होती.

हेही वाचा… वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आव्हाडांवर उल्हासनगरात गुन्हा; सिंधी समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपची तक्रार

याबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल दिली होती. या विभागाचे अधिक्षक सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सुरेश चोपडे यांच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यात सिंधू यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पथकाने गुरूवारी सापळा रचून सिंधू यांना तक्रारदार यांच्याकडून लाचेचा पहिला हफ्ता म्हणून ५० हजार रुपये घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naib tehsildar arrested in bhiwandi while accepting bribe of 50 thousand dvr