फुकटय़ा जाहिरातीसाठी झाडांवर खिळ्यांचे घाव; पालिकेचे दुर्लक्ष
एकीकडे राज्यात वनसंपदा वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मात्र काही फुकटे जाहिरातदार आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी थेट झाडांवर खिळे ठोकत असून त्यामुळे झाडांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करीत असून पालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.
शहरातील अनेक रस्त्यांवर फुकटे जाहिरातदार आपल्या व्यवसायाची जाहिरात झाडांवर करताना दिसत आहेत. शहरातील स्टेशन रोड, दत्त चौक, एचडीएफसी बॅंकेसमोरील आणि रस्ते रुंदीकरणातील अनेक झाडांवर मोठमोठय़ा खिळ्यांच्या मदतीने कापडी, प्लास्टिक आणि लोखंडी चौकटीतील जाहिराती ठोकण्यात आल्या आहेत. त्यामुळे झाडांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून आधीच कमी झालेल्या वृक्षसंपदेतील आणखी काही झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य अशोक सोनावळे यांनी नुकतेच मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे अशा जाहिरातदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, याबाबत पालिका क्षेत्रात वृक्षसंवर्धनासाठी काम करणाऱ्या निसर्ग ट्रस्टच्या ऋतुराज जोशी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकारामुळे वृक्षांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत असल्याचे सांगितले. मोठे लोखंडी खिळे ठोकल्याने झाडांना नुकसान होऊ शकते. झाडांच्या खोडाला भेगा पडल्यास त्यात किडे जाऊन ते झाड पोखरले जाऊ शकते. तसेच झाडांच्या भेगात पाणी गेल्यानेही झाडाच्या जीविताला धोका पोहचू शकतो, असेही त्यांनी सांगितले. याविषयी मुख्याधिकारी देविदास पवार यांच्याशी संपर्क केला मात्र, ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.