हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नकुल घाणेकर, अभिनेता
ग्रंथ हे गुरूसमान आहेत. आता आधुनिक युगात वाचनासाठी विविध माध्यमे उपलब्ध असली तरी पुस्तक हे पारंपरिक पद्धतीने वाचण्यातच खरी गंमत आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वावर पुस्तके सर्वाधिक प्रभाव टाकत असतात. त्यामुळे उत्तमोत्तम पुस्तके वाचल्याने आपल्या ज्ञानात भर पडतेच, शिवाय आपल्या जाणिवा अधिक समृद्ध होत असतात. मी बारावीत असताना खऱ्या अर्थाने वाचायला सुरुवात केली. मी विज्ञानशाखेचा विद्यार्थी. त्यामुळे सहाजिकच माझा सुरुवातीला विज्ञानविषयक पुस्तके वाचनाकडे कल होता. त्या काळात ही सूक्ष्मजीवशास्त्राविषयीची अनेक पुस्तके वाचली. पुढे ‘खूप झाला अभ्यास. आता इतर ललित वाचन कर’ असा सल्ला देऊन वडील आणि बहिणीने मला इतर साहित्य वाचनास प्रवृत्त केले. सध्या माझ्या घरात मराठी आणि इंग्रजी भाषेतील शेकडो पुस्तके आहेत. यामध्ये विज्ञानासोबतच डॉग ब्रििडगसारख्या विषयांवरील अनेकप्राणीविषयक पुस्तकांचा संग्रह आहे. कळत-नकळत पुस्तकं आपल्याला खूप काही देत असतात. अगदी सुरुवातीपासून माझ्या ते लक्षात आले. त्यामुळे मी वाचन अधिक गंभीरपणे करू लागलो. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे पुस्तक म्हणजे प्रसिद्ध इंग्रजी लेखिका जे.के. रॉलिंग यांची ‘हॅरी पॉटर’ या पात्राशी निगडित असणारी सर्व काल्पनिक पुस्तके. हॅरी पॉटर किशोरवयीन मुलांसाठी असले तरी मला वाटतं प्रौढ वाचकांनाही ही कथानके खिळवून ठेवतात. सध्या मी अनंत सामंतांची ‘मितवा’ ही कादंबरी दुसऱ्यांदा वाचत आहे. दुसऱ्यांदा वाचण्याचे कारण हे की लेखक आपल्या लेखनाशी एकरूप होऊन कशा प्रकारे आपल्या भावना वाचकापर्यंत पोहचवतो ही भावना मला भावते. त्यामुळे ही कादंबरी मी दुसऱ्यांदा वाचत आहे. पुस्तके हे माझ्यासाठी फक्त एक छंदाचा भाग नसून खऱ्या अर्थाने जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पुस्तके ही सतत माझ्या सोबतच असतात. माझ्या गाडीत दोन-तीन कादंबऱ्या, बॅगेत तीन-चारपुस्तके आणि सेटवर एक-दोन पुस्तके असतातच. वाचनासाठी मला विशेष असा वेळ काढावा लागत नाही. काम करीत असताना मिळालेल्या मोकळ्या वेळेत मी पुस्तक काढून वाचन सुरू करतो. त्यासाठी कोणत्याही विशिष्ट जागेचा माझा आग्रह नसतो. शूटिंगचा सेट असो किंवा प्रवासाचा वेळ मी वाचन करतोच. शूटिंग दरम्यान मी सहकलाकारांना नेहमी निरनिराळी पुस्तके वाचायला सुचवीत असतो. तसेच सहकलाकारही मला पुस्तके सुचवितात. मी पु.ल.देशपांडे यांची बटाटय़ाची चाळ, अपूर्वाई , गोळाबेरीज, असा मी असामी, एका कोळीयाने, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, पूर्वरंग यांसारखी अनेक पुस्तके मी वाचली व ती माझ्या संग्रहातही आहेत. त्याचसोबत आचार्य अत्रे यांच्या अनेक कविता मी वाचलेल्या आहेत. शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय, छावा, युगंधर यांसारख्या ऐतिहासिक कादंबऱ्याही मी वाचलेल्या आहेत.
त्याचबरोबर अमेरिकेत प्रवास करीत असताना मी थ्रिती उम्रीगर यांचे ‘द स्पेस बिटवीन अस’ हे पुस्तकही वाचले आहे. सिडनी शेल्डन यांची द अदर साइड ऑफ मिडनाइट, आर यू अफ्रेड ऑफ द डार्क यांसारख्या अनेक कादंबऱ्या वाचलेल्या आहेत. रणजीत देसाई यांच्या पावनखिंड, राधेय, स्वामी, श्रीमानयोगी या ऐतिहासिक कादंबऱ्या मला खूप आवडल्या. बेट्टी महमूदी यांचे ‘‘नॉट विदाउट माय डॉटर’’ हे पुस्तकही मी वाचलेलं आहे, विजय तेंडुलकरांची अनेक नाटके मला आवडतात. माझ्याकडून एकदा ‘पावनखिंड’ ही कादंबरी सेटवर हरवलेली आहे. त्याबद्दल मला आताही रुखरुख वाटते. पुस्तक म्हणजे एक प्रकारे व्यक्तीच आहेत. मित्र-मैत्रिणींप्रमाणे पुस्तके आपल्याशी संवाद साधतात. आपल्याला दिलासा देतात. त्यामुळे पुस्तकांच्या सान्निध्यात आपल्याला एकटे वाटत नाही. किंडले किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गोष्टींवर पुस्तके वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचायला मला अधिक आवडतं. कारण त्यातला स्पर्श इलेक्ट्रॉनिक वाचनापेक्षा अधिक प्रमाणात भिडणारा असतो. तरुण वाचक वर्गाला माझं एकच सांगणं आहे की खूप मोठय़ा प्रमाणावर योग्य वाचन करा आणि प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचा.