डोंबिवली पूर्वमधील संत नामदेव पथ या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावरील नारायण कृपा ही अतिधोकादायक इमारत बुधवारी आणि गुरुवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वेळेत कल्याण डोंबिवली पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात येणार आहे. हे पाडकाम सुरू असताना या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी हा रस्ता दोन दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.
संत नामदेव पथ दोन दिवस सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार असला तरी या कालावधीसाठी पर्यायी रस्ते मार्गांची व्यवस्था वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या रस्त्यांचा वाहन चालकांनी उपयोग करावा, असे पोलीस निरीक्षक गित्ते यांनी सांगितले. नारायण कृपा इमारत तोडण्यासाठी पोकलेने, जेसीबी, मनुष्यबळ रस्त्यावर असणार आहे. त्यामुळे या भागातून वाहतूक बंद ठेवणे आवश्यक आहे. यासाठी वाहतूक विभागाच्या सहकार्याने नारायण कृपा धोकादायक इमारत तोडण्यात येणार आहे, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
बंद रस्ता आणि पर्यायी मार्ग
मानपाडा रस्ता, चार रस्ताकडून संत नामदेव पथ मार्गे पाथर्ली, गोग्रासवाडीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक मानपाडा रस्ता कोपऱ्यावरील दीपेक्स इमारत, न्यू तेजस्वी इमारत याठिकाणी बंद करण्यात येणार आहे. याठिकाणी येणारी वाहने न्यू तेजस्वी इमारती जवळील डाव्या गल्लीमधून टिळक रस्त्याने इच्छित स्थळी जातील.
शेलार नाका, पाथर्ली, शांतीनगर भागातून संत नामदेव पथमार्गे मानपाडाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पाथर्ली येथील बकुळ पाटील दवाखाना, कार्तिक दर्शन इमारत याठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे. याठिकाणी येणारी सर्व अवजड व इतर वाहने बकुळ पाटील दवाखाना, कार्तिक दर्शन इमारती जवळील गल्लीमधून डावीकडे वळण घेऊन जिजाईनगर रस्त्याने इच्छित स्थळी जातील.