बदलापूरः कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कराची थकबाकी भरणाऱ्याकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांची नावे शहरात जाहीरपणे थेट बॅनरवर झळकली आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी असे बॅनर लावले जातील असे स्पष्ट केले होते. त्यानुसार मंगळवारी शहराच्या विविध भागातील थकबाकीदारांची माहिती असलेले बॅनर लावण्यात आले. यामुळे करवसुली आक्रमकपणे करण्याचा इशाराही मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.

कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने यंदाच्या आर्थिक वर्षात आक्रमक पद्धतीने करवसुली सुरू केली आहे. बदलापूर शहरात एकूण १ लाख २३ हजार २७३ रहिवासी मालमत्ताधारक आहेत. तर १४ हजार ३६५ वाणिज्य आणि ६४२ औद्योगिक अशा एकूण १ लाख ३८ हजार २८० मालमत्ता शहरात आहेत. चालु आर्थिक वर्ष २०२४-२५ ची एकूण मागणी ८१ कोटी ८४ लाख इतकी आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरवासियांनी मालमत्ता कर भरणा करण्याला प्रतिसाद दिला. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर थकबाकी नगर पालिकेला येणे बाकी आहे. त्यामुळे ते वसूल करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली.

सुरूवातीला वसूलीसाठी विशेष ५ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली होती. या पथकांमार्फत थकीत मालमत्ताधारकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. या भरारी पथकांनी सुरूवातीच्या टप्प्यात ५२ मालमत्ताची जप्ती केली होती. तर थकीत मालमत्ता करापोटी ६४ लाख १४ हजार ८९३ इतकी रक्कमही वसूल केली होती. तर थकीत मालमता कराची वसूलीसाठी भरारी पथकाद्वारे ३६ लाख ५१ हजार ३१० इतकी वसुलीही करण्यात आली होती. त्याचवेळी नागरिकांना आवाहन करूनही करभरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांची नावे थेट बॅनरद्वारे शहरात चौकाचौकांमध्ये लावली जातील, असा इशारा मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिला होता. त्यानुसार मंगळवारी शहराच्या विविध भागात पालिकेच्या वतीने थकबाकीधारकांची यादी बॅनरद्वारे लावण्यात आली. या बॅनरनंतर शहरातील थकबाकीधारक कर भरण्यासाठी पुढे येतील अशी आशा आहे. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या या धाडसी निर्णयाचे शहरात कौतुक होते आहे.

Story img Loader