लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: कर्नाटक विधानसभेच्या विजयानंतर उत्साह संचारलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत गुरुवारी संध्याकाळी हाथ से हाथ जोडो अभियानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या निमित्ताने माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी गौरव पुरस्कार विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने डोंबिवलीत लावण्यात आलेल्या फलकांवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख अति उत्साही कार्यकर्त्यांनी केला आहे. या व इतर फलकांवर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या छबीसह त्यांच्या नावाचा कोठेही उल्लेख नसल्याने काँग्रेसमधील एक गट नाराज झाला आहे.
हेही वाचा… जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आरोपपत्र
कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीत काँग्रेसमध्ये नेहमीच गटबाजीचे राजकारण झाले. अनेक वर्षानंतरही गटबाजी कायम असल्याने आगामी पालिका व अन्य निवडणुकांमध्ये पक्षाला बळ कसे मिळेल, असे प्रश्न निष्ठावान कार्यकर्ते करत आहेत. बऱ्याच कालावधीनंतर डोंबिवलीत काँग्रेसतर्फे कार्यक्रम होत आहे. या निमित्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांचे संघटन, शहरातील विविध जाणत्या नागरीकांशी संवाद संपर्क असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. या कार्यक्रमापूर्वीच फलकांवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उल्लेख एका गटाने भावी मुख्यमंत्री असा केला आहे. याच फलकांवर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा कोठेही नामोल्लेख, छबी नसल्याने थोरात समर्थक पदाधिकारी तीव्र नाराज झाले आहेत.
हेही वाचा… आंबिवलीतून चरस विकणारी महिला अटक
गटबाजीला नेहमीच खतपाणी घालून स्वताचा वरचढपणा कायम राहिल यासाठी प्रयत्नशील असलेले अर्ध्या हळकुंडातील नेते हा संकुचित विचार करत आहेत. थोरात महसूल मंत्री असताना हेच कार्यकर्ते त्यांच्याकडे भेटीसाठी रांगा लावून असायचे. आताच त्यांना त्यांचा विसर का पडला, असे डोंबिवली शहर काँग्रेसचे अध्यक्ष मामा पगारे यांनी सांगितले.
हेही वाचा… डोंबिवली जवळील खोणी गावात महावितरणच्या भरारी पथकावर ग्रामस्थांचा हल्ला
अशाप्रकारे गटबाजी करणाऱ्या नेते, पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ नेत्यांनी फटकारावे. काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व हाथ से हाथ जोडो अभियानातून तळागाळातील नागरिकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहचावे म्हणून प्रयत्न करत आहे. अशाच कार्यक्रमात स्थानिक काँग्रेस पदाधिकारी गटबाजीचे जाहीर प्रदर्शन करत असतील तर ते उभारी घेत असलेल्या काँग्रेसला मारक आहे, असे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले.
प्रदेश काँग्रेस समितीच्या मानव अधिकारी व सूचना अधिकार विभागातर्फे हा कार्यक्रम डोंबिवलीत सर्वेश सभागृहात आयोजित केला आहे. जिल्हाध्यक्ष राजकुमार हिरावत, कल्याण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पोटे, उपाध्यक्ष पाॅली जेकब यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात भास्कर शेट्टी, पाॅल पॅरापिली, डाॅ. अमित म्हात्रे, डाॅ. मुदसीर पोकर, सायमन वर्की, राजेंद्रन मेनन, संतोष शर्मा, दीक्षा सुवर्णा यांना प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.