नानासाहेब चापेकरांच्या स्मारकासाठी प्रयत्न सुरू ; नीलफलक आणि साहित्य आवृत्ती काढणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूरची ओळख जागतिक पातळीवर करून देण्यात अग्रणी ठरलेल्या नानासाहेब चापेकरांच्या स्मृती जपण्यासाठी शहरातील साहित्यप्रेमी एकत्र आले आहेत. नानासाहेबांचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांची ओळख नव्या बदलापूरला देण्यासाठी नीलफलक, साहित्य जनआवृत्ती व स्मारकाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यांच्या आजच्या जयंतीनिमित्त त्याची सुरुवात केली जाणार आहे.

बदलापूरचे नाव इतिहासात नोंद करण्याचे ऐतिहासिक काम नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चापेकर यांनी केले. ‘आमचा गाव बदलापूर’ या सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी बदलापूरचे तत्कालीन समाजचित्र पुस्तकरूपात मांडले. न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर नानासाहेबांनी बदलापुरात मुक्काम ठोकला. बदलापूर गावात त्यांचा वाडा होता. तिथे देशभरातील नावाजलेल्या साहित्यिकांना ते आईच्या साहित्यिक श्राद्धाला आमंत्रित करत असत. त्यामुळे बदलापूरला बडय़ा साहित्यिकांचे पाय लागले होते. १९३४ मध्ये बडोदा इथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेसाठी त्यांनी मोलाचे काम केले. त्या काळी बदलापूरसारख्या छोटाशा गावातून साहित्य, न्याय आणि इतिहासावर मोठय़ा प्रमाणावर काम होत होते. ५ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस. मात्र आज नानासाहेबांची कोणतीही आठवण शहरात उपलब्ध नाही. त्यांचा एकमेव वाडाही जमीनदोस्त करण्यात आला आहे. त्यामुळे महानगराच्या वाटेवर असलेल्या या शहराला नानासाहेब चापेकरांच्या कामाचा गंध नाही. याबाबत ‘लोकसत्ता’मधून वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यावर ‘ग्रंथसखा’ वाचनालयाचे शाम जोशी, श्रीधर पाटील आणि काही साहित्यप्रेमींनी एकत्र येत त्यांच्या स्मृती जपण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुण्याच्या धर्तीवर शहरात त्यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी एक नीलफलक लावण्यात येणार आहे. तसेच लोकवर्गणीतून त्यांच्या साहित्याची जनआवृत्ती काढण्यात येईल. तसेच शहरातील महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्यांचे छायाचित्र पालिका सभागृहात लावण्याचा विचार असून शहरात होणाऱ्या नाटय़गृहासही त्यांचेच नाव देण्याची मागणी करणार असल्याची माहिती श्रीधर पाटील यांनी दिली आहे. सध्या चापेकरांच्या साहित्याच्या मुद्रणाधिकार हक्कांबाबत त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क सुरू असून लवकरच त्यात यश येईल, अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली. साहित्यप्रेमींनी इतिहास जपण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nanasaheb chapekar memorial literature of badlapur
Show comments