शहरवासीयांना हवेहवेसे वाटणारे गावाकडचे निसर्गरम्य वातावरण, खुली व्यायामशाळा, विस्तीर्ण जॉगिंग ट्रॅक, भरपूर हिरवाई यामुळे कशिश पार्कलगत असलेल्या उद्यानात खूप प्रसन्न वाटते. सकाळच्या रामप्रहरी येथे फेरफटका मारला की दिवसभराची ऊर्जा मिळते, असे येथे फिरायला येणारी मंडळी सांगतात..
शहरी भागात शेकडो सुविधा उपलब्ध असल्या तरी त्याला गावकडच्या सुखाची सर येत नाही. गावाभोवतालचा निसर्ग, शुद्ध, मोकळी प्रदूषणरहित हवा, मृद्गंध, वासुदेवाचे गाणे, तुळशी वृदांवनावरील दिवा, मंदिरातील सुरेल घंटानाद हा अनुभव केवळ खेडय़ातच येऊ शकतो. मात्र अगदी आपल्या ठाण्यातही असे हवेहवेसे वातावरण काही ठिकाणी जतन करून ठेवण्यात आले आहे. त्यापैकी एक जागा म्हणजे ठाण्यातील कशिश पार्कमधील ‘डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उद्यान’
चारही बाजूंनी इमारती आणि मधोमध हे उत्तम उद्यान आहे. पाहताक्षणीच येथील सौंदर्य नजरेत भरते. उद्यानामध्ये खुली व्यायामशाळा, गणेश मंदिर, टेनिस मैदान, कारंजे, शोभिवंत झाडे, हिरवळ आणि चालण्यासाठी ट्रॅक आहे. उद्यानाच्या बाजूला छोटेखानी शेत आणि सुगंधी फुलझाडे आहेत. त्यामुळे इथे व्यायाम करायला अनेकांना आवडते. त्यामुळे सकाळ-संध्याकाळी येथे अनेकजण व्यायाम करीत असतात. कशिश पार्क या गृहसंकुलाच्या अगदी टोकाला ‘डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उद्यान’ आहे. इथे अगदी थेट गावाकडच्या पहाटेची आठवण येते.
सकाळी ५.३० च्या सुमारास हे मैदान नागरिकांसाठी खुले होते. येथे मंद आवाजात भक्तीगीते लावली जातात. त्यामुळे अगदी प्रसन्न वाटते. झाडांची दाटी, हिरवळीचे गालिचे आणि व्यायामासाठीची साधने यामुळे हे ठिकाण व्यायाम करणाऱ्यांना आकर्षित करते. त्यामुळे ठाण्यातील अनेक नागरिक या मैदानावर भल्या पहाटे व्यायामासाठी पोहोचतात.
योग, व्यायाम, खेळ आणि चालणे..
आरोग्याविषयीच्या जागृकतेने योग, व्यायाम आणि चालण्याकडे वळणाऱ्या नागरिकांसाठी या मनोरंजन मैदानामध्ये सगळ्या सुविधा प्राप्त होत असून कोणत्याही अडथळ्याशिवाय या ठिकाणी व्यायाम करता येतो. येथे योगसाधना करणाऱ्यांसाठी क्लब हाऊसमध्ये जागा उपलब्ध असून ज्येष्ठ नागरिकांचा गट, तरुण मंडळींसाठी खास व्यासपीठाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कट्टय़ावर आजी-आजोबा सकाळच्या वेळी क्षणभर विश्रांती घेताना दिसून येतात. या ठिकाणी सध्या सर्वत्र प्रचलित असणारा ‘ओपन जिम’ अर्थात खुली व्यायामशाळाही आहे. या ठिकाणच्या विस्तृत जॉगिंग ट्रॅकचा पुरेपूर वापर होताना दिसतो. शेकडोजण दररोज आपापल्या सोयीनुसार येथे चालतात. खेळणाऱ्यांसाठी येथे बंदिस्त मैदान असून त्यामध्ये वेगवेगळे खेळ खेळता येतात. जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला बसण्यासाठी छोटे बाकडे ठेवण्यात आले आहेत. दहा वर्षांखालील मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झोपाळा यासारखी खेळणीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर खेळताना मुले पडली तर त्यांना दुखापत होऊ नये यासाठी आधुनिक प्रकारातील मॅटचा वापर येथे करण्यात आला आहे. स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांच्या प्रयत्नांमुळे या उद्यानाला हे अनोखे रूप प्राप्त झाल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. मैदानाची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदार, सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संध्याकाळी या मैदानामध्ये कारंज्याचा आनंद घेता येतो. थुईथुई नाचणारे कारंजे पाहण्यासाठी बहुसंख्य तरुण उद्यानात दाखल होत असतात.
आध्यात्मिक प्रभात..
उद्यानाच्या प्रवेशद्वारातून आत येताच त्रिकोणी हिरवा लॉन व त्यावरील वासुदेव आणि गृहलक्ष्मी येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. तसेच या लॉनच्या समोर अतिशय रेखीव असे सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये सकाळ- संध्याकाळी आरती केली जाते. पहाटेची सुरुवात ही अशा आध्यात्मिक वातावरणात झाली की दिवस चांगला जातो, असे येथील ज्येष्ठांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर उद्यानामधील जागोजागच्या खांबावर स्पिकरची व्यवस्था करण्यात आली असून येथे सकाळच्या वेळी मंद आवाजात मधुर अशी अभंगवाणी कानी पडते.
अनुभवाचे बोल.
आरोग्याचा समतोल राखता येतो..
उद्यानाच्या माध्यमातून निवृत्त आणि ज्येष्ठ नागरिक एकत्र आलो आहोत. दररोज सकाळच्या वेळी आम्ही येथे जमत असतो. वृद्धापकाळात आरोग्याचा समतोल राखण्यासाठी येथील वातावरण आणि भोवतालच्या सुविधांची मदत होते. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवल्याचे मोठे मानसिक समाधान मिळते. मॉर्निग वॉकच्या वेळी शांत संगीताची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पहाटेच्या वेळचे वातावरण आणखी प्रसन्न होते.
–महादेव गावंडे
आल्हाददायी ठिकाण..
काही वर्षांपूर्वी या उद्यानाच्या ठिकाणी घनदाट जंगल होते. लोक येथे येण्यास घाबरत असत. मात्र स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने आज येथे उत्कृष्ट असे उद्यान नागरिकांसाठी तयार करण्यात आले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना हक्काचा मॉर्निग स्पॉट उपलब्ध झाला. पक्षी, प्राणी आणि निसर्गातील निरनिराळ्या वनस्पतींचे दर्शन इथे घडते. त्यामुळे नेहमीच इथे यायला आवडते. शिवाय येथील स्वच्छता पाहून मनाला समाधान मिळते.
–काशिनाथ कचरे
आरोग्य चांगले राहते..
येथील उत्कृष्ट वातावरणामुळे सकाळी लवकर उठायची सवय लागली. उद्यानातील शुद्ध हवा आणि प्रसन्न वातावरणामुळे येथे येऊन व्यायाम केल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. सोनचाफ्यांच्या फुलांचा सुगंधही येथे दरवळतो. त्यामुळे मन प्रसन्न राहते. उद्यानाला काही फेऱ्या मारल्या की जरा वेळ कट्टय़ावर विसावतो. कट्टे स्वच्छ असतात. उन्हाळा तसेच दिवाळीच्या सुट्टीत लहान मुलेही बालोद्यानात सायंकाळी खेळताना दिसतात.
–सविता वानखेडे
शहराच्या सान्निध्यात शुद्ध हवा..
शहराबाहेर आणि काहीसा जंगलाच्या सान्निध्यात असलेला हा परिसर सगळ्यांसाठीच आनंदाची पर्वणीच असून इथे व्यायाम करण्यासाठी अनेक मंडळी येतात. प्रत्येकाला हवे ते इथे मिळत असल्याने याबाबतीत आम्ही समाधानी आहोत. या परिसरातील खुल्या व्यायामशाळेचा आनंद येथील रहिवासी घेत असतात. तसेच येथील साहित्याची योग्य देखभाल करून कायमस्वरूपी वापरात ठेवण्यासाठी नागरिक सहकार्य करतात.
सुभद्रा मोरे,
ज्येष्ठ निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी उद्यान, ठाणे(प.)