डोंबिवली पूर्वेतील नांदिवली येथील नवनीत नगर भागात पाच ते सहा हजार नागरिकांची वस्ती आहे. या भागातील नागरिकांना वेळेवर केडीएमटी बस सुविधा नाही. रिक्षा चालक मनमानीने भाडे आकारत आहेत. नवनीत नगर परिसराला फेरीवाल्यांचा विळखा पडला असताना पालिका अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नाही, अशा तक्रारी या भागातील नागरिकांनी केल्या.नवनीत नगर हा डोंबिवली पू्र्व भागातील व्यावसायिक, नोकरदार नागरिकांच्या वस्तीचा भाग आहे. सुमारे पाच ते सहा हजार लोकवस्ती असलेल्या या भागाला रस्ते, बस सुविधा वेळेवर मिळत नसल्याने या भागातील रहिवाशांचे हाल होत आहेत. या वस्ती मधील मुले डोंबिवली परिसरातील शाळांमध्ये शिक्षणासाठी जातात. त्यांनाही या असुविधांचा फटका बसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणे : वृद्धेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळून नांदिवली नवनीत नगर भागात जाण्यासाठी रिक्षा चालक २० ते २५ रुपये भाडे मागतो. रात्रीच्या वेळेत हे भाडे दामदुप्पट आकारले जाते. केडीएमटीच्या बसच्या नवनीत नगर भागात फेऱ्या होतात. या फेऱ्या अनियमित होत असल्याने प्रवाशांना रिक्षा प्रवासी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. नवनीत नगर ते डोंबिवली रेल्वे स्थानक अर्धा तासाने बस फेऱ्यांचे नियोजन केडीएमटीने केले तर या बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू शकतो. परंतु, तसे नियोजन केडीएमटीकडून केले जात नाही. या भागातील रहिवाशांनी अनेक वेळा केडीएमटी अधिकाऱ्यांना नवनीत नगर भागातील बस फेऱ्या वाढविण्यासाठी विनंत्या केल्या, त्याची दखल घेतली जात नाही, असे या भागातील रहिवासी रमणभाई शहा यांनी सांगितले.

हेही वाचा >>> सकाळी ७.३० ते ९ वाजेपर्यंत तीन वातानुकूलित लोकल सुरू करा ; कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांची मागणी

केडीएमटीने नवनीत नगर भागात बस थांबा बांधला आहे. तेथे बस फेऱ्यांचे वेळापत्रक लावले जाते. परंतु त्या वेळेप्रमाणे बस येत नाही. बस थांब्यातील वेळापत्रक अनेक वेळा रिक्षा चालकांकडून फाडून टाकले जाते. या ठिकाणी नियमित बस सुरू झाली तर त्याचा परिणाम रिक्षा प्रवासी वाहतुकीवर होतो. बसचे तिकीट भाडे डोंबिवली रेल्वे स्थानक ते नवनीत नगर १० रुपये आहे. याच अंतरासाठी रिक्षेचे भाडे २० ते २५ रुपये आहे. त्यामुळे नवनीत नगर भागात नियमित बससेवा सुरू केली तर या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असे महावीर बडाला यांनी सांगितले.नवनीत नगर भागातून सर्वाधिक मालमत्ता कराचा महसूल पालिकेला मिळतो. त्या प्रमाणात या भागात नागरी सुविधा दिल्या जात नाहीत. या भागातील रस्ते खराब झाले आहेत. त्यांची देखभाल वेळेत होणे आवश्यक आहे. नवनीत नगर भागातील रस्ते, बस थांबे फेरीवाल्यांनी व्यापलेले असतात. पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ रिकामे ठेवले जात नाहीत. रहिवाशांनी फेरीवाल्यांना रस्त्यातून बाजुला बसण्यास सांगितले तर फेरीवाले उलट उत्तरे देतात, एवढी मग्रुरी या भागात फेरीवाल्यांची वाढली आहे, असे रहिवाशांनी सांगितले.

नवनीत नगर हा डोंबिवली शहरातील महत्वाचा भाग असुनही त्याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने या भागातील रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत.केडीएमटी अधिकाऱ्याने या भागातील प्रवासी वाहतूक संख्या विचारात घेऊन नवनीत नगर भागात बस फेऱ्या सो़डल्या जातात. सकाळी, संध्याकाळी या भागात सर्वाधिक बस फेऱ्या होतात, असे सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nandivali navneet nagar in dombivali is the epitome of civic problems amy