गाळउपसा झाल्याने शेतीसाठी जलसाठा उपलब्ध; माळशेज मार्गावर नवे पर्यटन केंद्र

ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये यंदा प्राचीन नाणेघाटातील नाणे तलावाचाही जीर्णोद्धार झाला असून खोलीकरणाच्या कामांमुळे ऐन मे महिन्यात या कोरडय़ा तलावास चक्क पाझर फुटला आहे. त्यामुळे स्थानिक आदिवासी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या तळ्यातील पाण्याचा परिसरातील शेती आणि भाजीपाला लागवडीसाठी उपयोग होईलच, शिवाय कल्याण-नगर रस्त्यालगत असल्याने माळशेज घाट परिसरात येणाऱ्या पर्यटकांनाही या रम्य तळ्याकाठी काही क्षण विसावा घेता येईल.

सह्य़ाद्रीच्या डोंगररागांमधील नाणेघाटाचे प्रतिबिंब या तळ्यात पडत होते, त्यामुळेच या तळ्याला नाणे हे नाव पडले. स्थानिक परिसरात हा तलाव शिवकालीन असल्याचे सांगितले जात असले, तरी या घाटमार्गाप्रमाणेच तलावही तब्बल दोन हजार वर्षांपूर्वीचा, सातवाहनकालीन असावा असा इतिहासतज्ज्ञांचा अंदाज आहे. यंदाच्या पावसाळ्यात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून त्यात पूर्वीप्रमाणेच नाणेघाटाचे प्रतिबिंब पाहता येऊ शकणार आहे. सध्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या ‘सीएसआर’ उपक्रमात या तलावातील गाळ उपसण्याचे काम सुरू असून पावसाळा सुरू होईपर्यंत ते सुरू राहणार आहे.

मुरबाड तालुक्यातील झाडघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शिसेवाडीच्या सामूहिक वनक्षेत्रात हा तलाव येतो. वर्षांनुवर्षे गाळ साचल्याने या तलावाला पावसाळी डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पावसाळा संपल्यावर डिसेंबर-जानेवारीमध्ये हा तलाव कोरडा होत होता. मात्र दोन वर्षांपूर्वी वन विभागाने या तलावातील साधारण दीड-दोन मीटर गाळ काढला. त्यामुळे गेल्या पावसाळ्यात तलावाचा पुनर्जन्म झाला. यंदाही वन विभागाने काही दिवस तलावातील गाळ काढला. त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे. गाळ काढत असताना तलावाला पाझर फुटल्याने स्थानिकांचा उत्साह वाढला आहे. झरे जिवंत झाल्याने आता तळ्यात बारमाही पाणी राहील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. याच तलावालगत शिसेवाडीने राखलेले सामूहिक वन आहे. गावातील शेतकरी येथे काही प्रमाणात शेती तसेच भाजीपाला लागवडही करतात. त्यांना या तलावातील पाण्याचा उपयोग होणार आहे.

या परिसरात मोठय़ा प्रमाणात कासवे आहेत. नाणे तलावातही पूर्वी कासवे होती. आता नवसंजीवनी मिळाल्यानंतर या तलावात कासव निरीक्षण केंद्र करता येऊ शकेल.

नवसू शिवा वाघ, शिसेवाडी 

एरव्ही सरकारी काम म्हणजे मनस्ताप असा अनुभव असतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाने स्थानिकांच्या हिताचे अनेक निर्णय तातडीने घेतले. त्याला वन विभागाचीही साथ लाभली. शासकीय यंत्रणांच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळे ग्रामीण भागात भरीव कामे होऊ शकली.

अ‍ॅड. इंदवी तुळपुळे, श्रमिक मुक्ती संघटना, मुरबाड

Story img Loader