ठाणे : पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये अनामत रक्कम भरली नाही म्हणून महिलेचा उपचाराचाअभावी मृत्यू झाल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच, ठाणे शहरातील कौशल्य रुग्णालय आणि श्री महावीर जैन रुग्णालयने गेल्या पाच वर्षांत गरीब रुग्णांसाठी वापरलेला निधी, तसेच शहरातील धर्मादाय रुग्णालयमध्ये अनामत रक्कमसाठी बंदी घालण्याबरोबरच गरीब व दुर्बल घटकांसाठी दररोज उपलब्ध होणाऱ्या राखीव २० टक्के जागांचा तपशील वेबसाईटवर जाहीर करावा, अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. शहरातील धर्मादाय रुग्णालयमध्ये गरीब रुग्णांकडूनही जादा रक्कमेची बिले आकारली जात असून, अनामत रक्कमेची सक्ती केली जात असल्याचा आरोप नारायण पवार यांनी केला आहे.

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयमध्ये अनामत रक्कम भरली नाही म्हणून एका महिलेचा उपचाराअभावी मृत्यु झाला, असा आरोप तिच्या कुटूंबियांनी केला होता. हे प्रकरण गेले काही दिवस राज्यभरात चर्चेत आहे. असे असतानाच, गरीब रुग्णांसाठीच्या सुमारे ३५ कोटी रुपयांचा खर्च केला नसल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील तीन रुग्णालयांकडे नारायण पवार यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. पाचपाखाडी येथील कौशल्य मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट हॉस्पिटल व लुईसवाडी येथील श्री महावीर जैन हॉस्पिटल आणि श्री प्रताप जे. आशर कार्डिॲक सेंटरला महापालिकेने जागा दिली आहे. तर ठाण्यातील पोखरण रोड क्र. २ येथील बेथनी हॉस्पिटल हे धर्मादाय हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहे.

कौशल्य आणि बेथनी हॉस्पिटलमध्ये गरीब व दुर्बल घटकांसाठीच्या राखीव जागांचा तपशील हा सामान्य नागरिकांना समजू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी उपलब्ध जागा व उपचार घेणाऱ्या रुग्णांची नावे रुग्णालयाच्या वेबसाईटवर जाहीर करावी. श्री महावीर जैन हॉस्पिटलमधील १० टक्के बेड गरीब रुग्णांसाठी मोफत उपलब्ध व्हावेत, यासाठी कार्यवाही सुरू करावी. अन्यथा, या ट्रस्टला महापालिकेने दिलेली इमारत पुन्हा परत घ्यावी, अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे.

ठाणे शहरातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराच्या खर्चाची निश्चित रक्कमेची माहिती आधी रुग्णांच्या नातेवाईकांना द्यावी. महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयाची तपासणी करून नोंदणीचे वा नुतनीकरणाचे अधिकार महापालिका प्रशासनाकडे आहेत. त्यावेळी या संदर्भात शहरातील खासगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला नियमानुसार योग्य सूचना द्याव्यात, असे नारायण पवार यांनी पत्रात म्हटले आहे.