ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ९ आणि १० मधील पादचारी पुलाच्या जीन्याजवळ एका बेवारस बॅगेत अमली पदार्थ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लोहमार्ग पोलिसांचे पथक १९ जानेवारील गस्ती घालत होते. दुपारच्या वेळेत काही प्रवाशांना एक मोठी बेवारस बॅग स्थानकातील फलाट क्रमांक ९ आणि १० येथील मुंबई दिशेकडील पादचारी पुलावरील जिन्यावर आढळून आली. बेवारस बॅग असल्याने याची माहिती तात्काळ प्रवाशांनी पोलीस पथकाला दिली.
पोलिसांनी बॅगेची तपासणी करून ती पोलीस ठाण्यात नेली. पंचासमक्ष बॅग उघडून पाहिली असता, त्यामध्ये जॅकेट आणि एक मोठी पिशवी आढळून आली. ही पिशवी उगडली असता, त्यामध्ये प्लास्टीकच्या पिशव्यांमध्ये भरलेली गांजाची पाकीटे आढळून आली. या पाकीटांचे वजन केले असता, ते ५०० ग्रॅम इतके आढळून आले. दरम्यान, या घटनेनंतर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.