घोडबंदर भागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी नरेश मणेरा यांच्यासह १० ते १२ जणांविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी नरेश मणेरा यांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली. नरेश मणेरा हे माजी नगरसेवक असून, त्यांनी उपमहापौरपदही भूषवले आहे. त्यांच्या अटकेवेळी कासारवडवली पोलीस ठाण्याबाहेर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे, तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा – ‘आम्ही दाबणार ‘नोटा’; पुण्याच्या कसब्यातील फलकाची शहरात चर्चा
हेही वाचा – खराडी भागात जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांविरुद्ध गुन्हा
घोडबंदर भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने महाराष्ट्र उत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख नरेश मणेरा हे कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक होते. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री त्या घरामध्ये असताना त्यांना कार्यक्रमातील ध्वनीक्षेपकाच्या आवाजाचा त्रास झाला. त्यामुळे, त्या कार्यक्रम बंद करण्यासाठी नरेश मणेरा यांना भेटण्यासाठी गेल्या. त्यावेळी तेथील महिलांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, नरेश मणेरा यांच्यासह १० ते १२ महिला आणि पुरुषांनी गर्दीमध्ये त्यांचा विनयभंग केला. या प्रकारादरम्यान गळ्यातील सोनसाखळीही चोरीला गेल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी कासारवडवली पोलिसांनी मणेरा यांना अटक केली. या अटकेनंतर मणेरा यांचे समर्थक कासारवडवली पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. त्यामुळे, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.