ठाणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्याविषयी कोकणवासीय म्हणून माझ्यासह खासदार राजन विचारे यांना त्यांच्याबद्दल आपुलकी होती. विचारे यांच्यासह मुंबईतील काही वरिष्ठ नेते मंडळींनी पक्षावर दबाब आणण्यासाठी कट रचून आमच्या खांद्यावर बंदूका ठेवल्या. पण, फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली, असा गंभीर आरोप बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी करत खासदार राजन विचारे यांच्यावर पलटवार केला.
विधानसभा निवडणुकीत भाजपने दिलेला एबी फार्म नाकारला होता आणि राष्ट्रवादीनेही विधान परिषद सदस्य पदासाठी दिलेली ऑफरही नाकारली होती. त्यामुळे आम्हाला कोणीही पक्ष निष्ठा शिकवू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. स्वत:च्या वाॅर्डात निवडून येण्यापुरते हे लोक काम करीत होते. पण, मी संपुर्ण जिल्ह्यात पक्षवाढीसाठी काम करित होतो. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्याविषयी कोकणवासिय म्हणून माझ्यासह खासदार राजन विचारे यांना त्यांच्याबद्दल आपुलकी होती. इतरांनाही तशी राणे यांच्याबद्दल आपुलकी होती. विचारे यांच्यासह मुंबईतील काही वरिष्ठ नेते मंडळींनी पक्षावर दबाब आणण्यासाठी कट रचला. आम्ही त्यावेळेस २५ ते २६ वर्षांचे होतो.
लहान असल्यामुळे आमच्या खांद्यावर त्यांनी बंदूका ठेवून पक्षाला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला. पण फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याचा गौप्यस्फोट नरेश म्हस्के यांनी केला आहे. मधुकर देशमुख हे आमच्यावर आरोप करत आम्हाला पक्ष निष्ठा शिकवत आहेत. पण, मागील महापालिका निवडणुकीत त्यांच्या मोठ्या मुलाने पक्षाच्या उमेदवार नंदीनी विचारे आणि रुचिता मोरे यांच्याविरोधात काम केले. वडीलांना विचारल्या शिवाय त्याने हे काम केले का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वार्डात पक्षविरोधी कामे केल्यामुळेच आनंद दिघे यांनी त्यांना दूर केले होते, असा दावाही त्यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणुकीत विजय चौगुले हे उमेदवार असताना, त्यांच्याविरोधात कोणी काम केले, माजी पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट कोणी घेतली आणि कुठे कुठे बैठका झाल्या, हे मला सांगायला लावू नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
भास्कर पाटील हे बाळासाहेबांच्या शिवसेनेतच
नौपाड्यातील ज्येष्ठ माजी नगरसेवक भास्कर पाटील यांना काही जणांनी त्यांना गाडीत बसवून नेले आणि त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत असल्याचे सांगितले. त्यांच्यावर दबाब टाकण्यात आला असावा किंवा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखविली गेली असेल. त्यामुळेच त्यांनी असे सांगितले असेल, असा दावा त्यांचे बंधु जंयत पाटील केला होता. तर, भास्कर पाटील हे आमच्याच पक्षात असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केला होता. मात्र, हे दावे आता फोल ठरले आहेत.
भास्कर पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेत असल्याचे स्पष्ट केले आहे. गणेशोत्सवाच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घरी आले होते, त्यावेळेसच आम्ही त्यांना पाठींबा देऊ केला होता. पक्षात दोन गट पडले, त्यावेळेस ठाकरे गटाने दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली होती. परंतु त्यांच्या पक्षाशी माझा संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जून ते जानेवारी याच काळात विचारे यांना माझी आठवण झाली असून या आधी त्यांना माझी आठवण कधी झाली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.