लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जेव्हा आम्ही आंदोलन करायचो, तेव्हा जितेंद्र आव्हाड यांना सांभाळून घ्या असे फोन आम्हाला मातोश्रीवरून यायचे, ते आपल्यातच येणार आहेत असे सांगितले जायचे, एवढे मातोश्रीला आव्हाड यांच्या विषयी प्रेम होत, असा गौप्यस्फोट शिंदेच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. आव्हाड रात्रीचे बुवा आणि मांत्रिकांच्या मध्ये बसलेले असतात, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणतात आणि वेगवेगळ्या बुवा बाबांचे गंडेदोरे बांधतात, असा आरोपही त्यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात हिरवा साप आणि दुतोंडी साप म्हणतात. ते रात्रीचे ट्विट करतात आणि सकाळी डिलीट करतात, रात्री त्यांची अवस्था काय असते हे त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना विचारा. नेहमीप्रमाणे त्यांनी आता खंत व्यक्त केली आहे, कदाचित ते त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत त्या अवस्थेतून निघाले नसतील, अशी टीकाही म्हस्के यांनी केली. आव्हाड यांच्या विरोधात जेव्हा आम्ही आंदोलन घ्यायचो तेव्हा आम्हाला मातोश्रीवरून जितेंद्र आव्हाड यांना सांभाळून घ्या असे फोन यायचे, ते आपल्यातच येणार आहेत असं सांगितलं जायचं, एवढा मातोश्रीला जितेंद्र आव्हाड यांच्या विषयी प्रेम होत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. कळवा शिवसेना शाखा तोडण्याचा पुरावा आम्ही मातोश्रीला दिला होता तरी देखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा-आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर भाजपचे आंदोलन
जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाशी मातोश्री संजय राऊत सहमत आहात का? संजय राऊत आता काय मूग गिळून शांत बसले आहेत का? हेच का तुमचं हिंदुत्व, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. खुर्चीसाठी मातोश्री ने हिंदुत्व सोडलेले आहे, त्यांनी त्यांच्या जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलावे, भूमिका मांडावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. महाराष्ट्र हिंदुस्थानातील लोकांची माथी भडकवण्याच काम जितेंद्र आव्हाड करत आहे, दंगली भडकवण्याचा त्यांचा कट आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे हे देखील या बद्दल बोलत नसतील तर त्यांनी वक्तव्याला समर्थन दिल आहे असं मी मानतो, असेही ते म्हणाले.