पृथ्वी सदृश वातावरण असणाऱ्या यंत्राचा शोध; गुरुत्वाकर्षणाचाही पर्याय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : ठाण्याच्या अवघ्या १७ वर्षांच्या अक्षत मोहितेला अमेरिकेत होणाऱ्या २०१८ च्या इंटरनॅशनल स्पेश डेव्हलपमेंट कॉन्फरन्ससाठी नासातर्फे आमंत्रित करण्यात आले आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे काँक्रीटचे जंगल आणि प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या पृथ्वीला असलेल्या आरामाची गरज ओळखून अक्षतने पृथ्वी ग्रहाचा भार कमी करत सुमारे २० हजार लोक पृथ्वीसारख्याच चांगल्या वातावरणात राहतील, अशा यंत्राच्या केलेल्या संशोधनाची नासाने दखल घेतली आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला समोर ठेवून तयार करण्यात आलेल्या या यंत्राच्या संशोधनामध्ये सुमारे २० हजार लोक राहू शकतील. यंत्रामधून लोकांना अंतराळात पाठवून पृथ्वीवरील त्या भागात वृक्षलागवडीसारख्या सुधारणा करण्याच्या हेतूने हे संशोधन केले जाऊ शकते.

औद्योगिक वातावरण आणि रोजच्या जगण्यासाठी आवश्यक वातावरण वेगळे ठेवणे, विद्युत उपकरणांपासून लाय-फाय ही इंटरनेट सुविधा तयार करणे, मनोरंजनासाठी अर्ध-गुरुत्वाकर्षण असणारे फुटबॉल स्टेडिअम तयार करणे तसेच शेती अशा अनेक सुविधांचा या संशोधनामध्ये समावेश करण्यात आला आहे. अंतराळातील गुरुत्वाकर्षणाच्या समस्येवर तोडगा म्हणून येथे गुरुत्वाकर्षणाचाही पर्याय उपलब्ध केला जाणार आहे. एकूणच पृथ्वीला काही काळ सुट्टी मिळावी यासाठी नागरिकांना अशा यंत्राच्या साहाय्याने अंतराळात नेऊन तेथे त्यांना सुविधा उपलब्ध करून देणारे हे संशोधन करणाऱ्या ठाणेकर अक्षत मोहितेला २४ मे ते २७ मे दरम्यान अमेरिका देशात होणाऱ्या इंटरनॅशनल स्पेश डेव्हलपमेंट कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडच्या विजय नगरीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या अक्षत मोहितेने ठाण्याच्या आर्या केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमधून त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या अक्षत मुलुंडच्या होली अेंजल हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये असून नुकताच त्याने बारावी इयत्तेत प्रवेश केला आहे.

दहा दिवसांच्या अथक प्रयत्नांनी तयार केलेल्या या संशोधनासाठी मला नासामधून दूरध्वनी आला हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. नववी इयत्तेपासून विज्ञान विषयाची गोडी लागल्याने आज इतक्या कमी वयात मला इतकी मोठी संधी लाभली आहे असे अक्षत याने सांगितले. कुटुंबीय, भौतिकशास्त्राचे शिक्षक दीपेश धायफुले आणि नासाचे प्रतिनिधी प्रणित पाटील यांचे त्यांनी या वेळी आभार व्यक्त केले. संशोधन करताना वेळोवेळी महाविद्यालयाने सांभाळून घेतले नसते तर हे संशोधन करणे शक्य झाले नसते, असेही तो म्हणाला.