ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील खाडीकिनारी परिसरात अनधिकृत कचरा आगारामुळे खारफुटी नष्ट होऊन जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत येथील कचरा साफ करून खारफुटीचे पुनर्जिवित करण्याची मागणी राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांची लेक नताशा आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर केली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असून यानिमित्ताने आव्हाड यांची लेक खाडी परिसर बचावासाठी मैदानात उतरल्याचे चित्र आहे.
मुंबई – नाशिक हायवे वरील फार्महाऊस द बिस्ट्रो ढाबा जवळील (बॉम्बे ढाब्याच्या समोर) अनधिकृत कचरा टाकण्यात येतो. या कचरा आगारातील दुर्गंधीमुळे पारसिक नगर, खारीगाव आणि कळवा भागातील नागरिक त्रस्त आहेत. कचऱ्यामुळे नागरिकांना विविध आरोग्यविषयक समस्याना सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांची लेक नताशा आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी (शरद पवार गट ) चे पदाधिकारी अभिजीत पवार यांनी कचरा आगाराची पाहाणी करत त्यामुळे येथील नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा समोर आणला होता. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रश्नासंबंधी आयुक्तांना निवेदन देऊनही या ठिकाणचे कचऱ्याचे ढीग वाढतच असल्यााची टिका नताशा यांनी त्यावेळी केली होती. वारंवार नागरिकांकडून तक्रार करून, आंदोलन करून ही प्रशासनाने संबंधितावर कारवाई करत नसल्याचा आरोप करत तात्काळ संबंधित लोकांवर कारवाई करून कचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी केली होती. त्यापाठोपाठ आता त्यांनी याच कचरा आगाराबाबत काही महत्वाचे मुद्दे उपस्थित करत त्यासंबंधीची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे.
नताशा आव्हाड म्हणाल्या, ‘ मागच्या आठवड्यात जेव्हा आम्ही कचऱ्याचा विषय उचलला होता, तेव्हा आमच्यापर्यंत खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यानंतर आम्ही या विषयात अजून खोल जाऊन अभ्यास करायचा निर्णय घेतला. तेव्हा काही धक्कादायक गोष्टी आमच्या समोर आल्या. २०१८ ते २०२४ या काळातील गुगल मॅपवर सॅटेलाईट इमेज पाहिले तर, तिथल्या खारफुटीचा नाश केलेला गेल्याचे दिसून येते. त्याला लागूनच जगप्रसिद्ध पाणथळ क्षेत्र आणि फ्लेमिंगो अधिवास क्षेत्र आहे. कचऱ्यामुळे प्लास्टिकचा कचरा खाडीत जातो आणि त्याचा त्रास तिथे येणाऱ्या पक्षांना होतो. कचऱ्यामुळे विषारीयुक्त वायु पसरून परिसरातील नागरिकांना त्रास होतो. रहिवासांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा खूप गंभीर विषय आहे आणि त्यावर ठाणे महापालिका काहीही ठोस कारवाई करीत नाही’, असे त्यांनी म्हटले आहे. येथील कचरा साफ करून खारफुटीचे पुनर्जिवित करण्याची मागणी करत पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.