Natasha Awhad Post: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस पक्षाला एकत्रितपणे केवळ ४९ जागा जिंकता आल्या आहेत. तर महायुतीला २३५ हून अधिक जागा मिळाल्या आहेत. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे सातत्याने ईव्हीएमवर आरोप करत आहेत. जितेंद्र आव्हाड यांचा स्वतःचा ९५ हजाराहून अधिकच्या मताधिक्याने विजय झाला आहे. तरीही त्यांनी ईव्हीएमवर शंका घेणारे मुद्दे उपस्थित केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने सोशल मीडियावर यासंबंधी माहिती देत आहेत. आता जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाडही मैदानात उतरली असून तिने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मविआचा एवढा मोठा पराभव का केला गेला? याबाबत निरनिराळे दावे केले आहेत.
मविआला ५० च्या खाली का ठेवले?
नताशा आव्हाड यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवर निकालावर भाष्य करणारी सविस्तर पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “निवडणूक निकालात फेरफार करून भाजपा पक्ष स्वतःला १०० जागा घेऊन शांत बसला असता. पण त्यांनी इतक्या जास्ती जागाच (१३२) लक्ष्य का ठेवले? त्याचप्रमाणे सहकारी पक्ष शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार) इतक्या जास्त जागा का वाढवून दिल्या? महाविकास आघाडीला ५० जागांच्या खाली का ठेवले गेले?
“कारण भाजपसाठी ही एक अतिमहत्त्वाची निवडणूक होती आणि काहीही झाले तरी भाजपाला सत्तेत यायचे होते. शिवाय, महायुतीमधील दोन्ही पक्षांपैकी कोणत्याही पक्षाला त्यांच्याशी किंवा महाविकास आघाडीशी सौदा करण्याची संधीच द्यायची नव्हती. यासाठी निकाल इतका हुशारीने तयार करण्यात आला की त्यात भाजपा शिवाय सरकारच स्थापन करता येणार नाही. याची काळजी घेतली गेली”, असे नताशा आव्हाड यांनी म्हटले.
भाजपला जिंकणे इतके महत्त्वाचे का होते?
भाजपाला विजय मिळवणे आवश्यक होते. याचीही तीन कारणे नताशा आव्हाड यांनी सांगितली आहेत. ही कारणे खालीलप्रमाणे..
१. अदाणींनी धारावी प्रकल्प गमावला असता.
२. केंद्रातील त्यांचे सरकार धोक्यात आले असते.
३. भाजपा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून बेदखल झाला असता.
“यामुळे महाराष्ट्राचा निकाल निवडणुकीपूर्वीच दिल्लीत ठरवला गेला. राज्यात झालेल्या निवडणुका हा फक्त दिखावा होता”, अशी टीका नताशा आव्हाड यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे.