राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे बघायला मिळते आहे. दरम्यान, याबाबत आता जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड हिने प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या वडिलांवर जे आरोप करण्यात आले आहे, ते खोटे आणि धक्कादायक असल्याचे नताशाने म्हटले आहे.
“माझ्या वडिलांवर जो आरोप करण्यात आला आहे, तो अतिशय धक्कादायक आहे. या आरोपांमुळे माझ्या परिवाराला मानसिक त्रास होतो आहे. काल रात्रीपासून माझे वडील आणि आम्ही झोपलेलो नाही”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड हिने दिली आहे. “राजकारणात असे वादविवाद होत राहतात. मात्र, या पद्धतीने जेव्हा तुम्ही आरोप करता, तेव्हा त्याचा परिणाम एका व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण परिवारावर होत असतो. महिलांच्या सुरक्षेसाठी हे कायदे बनवले आहेत. मात्र, याचा गैरवापर होत असेल तर त्याचा परिणाम इतर महिलांवरही होतो”, असेही ती म्हणाले.
रविवारी ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या गर्दीमधून वाट काढून पुढे सरकत होते. यावेळी भाजपाच्या महिला पदाधिकारी वाटेत आल्याने आव्हाड यांनी त्यांना बाजुला लोटत वाट काढण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांसमोर मला अपमानित केलं असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला.