‘नथुराम गोडसे यांनी नेहरूंऐवजी गांधींचा खून करून चूक केली काय? नथुरामसारखे चांगले नाटक तुम्ही का बंद केले? हे नाटक तुम्ही पुन्हा कराल का? नाटकातील एक संवाद सादर करा.. एक संवाद सादर होताच दुसऱ्या संवादाची होणारी आवाजी मागणी, नथूरामांवरील नाटक पुन्हा सुरू व्हावे यासाठी काहींनी थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना घातलेली गळ आणि नथुराम नाटक सुरू करा, अशी मागणी पहिल्यांदा करणाऱ्या एका रसिकाला अन्य प्रेक्षकांनी मिठय़ा मारून दिलेली ‘शाबासकी’ असे नथुराममय वातावरण नाटय़संमेलनाच्या सकाळच्या सत्रात उपस्थितांना पाहायला मिळाले.
अभिनेते शरद पोंक्षे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात आयोजित करण्यात आला होता. मुलाखतीच्या सुरुवातीला गांधी आणि नथुराम या वादात न पडता याविषयाला काहीशी बगल देण्याचा प्रयत्न शरद पोंक्षे यांनीही केला. ‘कशाला भलते प्रश्न विचारता.. ठाण्यातील जितेंद्र-धर्मेद्रांना जागे करता..’ असा काहीसा सूर त्यांनी सुरुवातीला लावला खरा, मात्र प्रेक्षकांमधील काहींनी त्यांना बोलण्याचा आग्रह केल्यानंतर पोंक्षे यांचीही गाडी सुसाट सुटली. ‘सध्या गांधींएवढे नथुरामचे छायाचित्र लोकप्रिय नाही. मात्र कालांतराने ही परिस्थिती नक्कीच बदलेल. एक काळ असा येईल नथुरामचे छायाचित्र प्रसिद्ध होईल’, असे एका प्रश्नाच्या उत्तरात पोंक्षे म्हणाले. सध्या अहिंसक होता होता आपण नपुंसक झालो आहोत, असे भाष्य त्यांनी नथुरामच्या विचारांचे समर्थन करताना केले.
भविष्यात गांधीही साकारायचे आहेत
नथुरामाची भूमिका साकारली असली तरी भविष्यात गांधींची भूमिका साकारायलाही आवडेल, अशी इच्छा पोंक्षे यांनी व्यक्त केली.
नाटय़संमेलनात नथुरामायण..
‘नथुराम गोडसे यांनी नेहरूंऐवजी गांधींचा खून करून चूक केली काय?
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 22-02-2016 at 00:15 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nathuram godse akhil bharatiya marathi natya sammelan thane