लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : आपल्या राष्ट्रध्वजाच्या केंद्रस्थानी धम्मचक्र आहे. तो बंधुभाव, समानता, समरसतेचा संदेश देतो. सर्वांच्या समानतेचा, स्वातंत्र्यतेचा संदेश देतो. या सर्व बाबी लक्षात घेऊनच आपल्याला जीवनात राहायचे आहे. कारण एका-दुसऱ्यामुळे राष्ट्र मोठे होत नाही. पूर्ण समाजाला आपला देश मोठा व्हावा यासाठी प्रयत्न करावे लागतात. देश मोठे झाल्यास आपली प्रतिष्ठा देखील मोठी होते असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

भिवंडी येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. व्यक्तीला मोठे व्हायचे असेल तर त्याच्यासाठी स्वातंत्र्य, समता असली पाहिजे. सर्वांना संधी मिळायला हवी. बंधूता असेल तेव्हाच हे शक्य होईल. बंधूतेच्या आधारावर जर व्यक्ती मोठा झाला तर तो त्याच्या कुटुंबाला मोठे करतो आणि कुटुंब त्याच्या गावाला मोठे करते. ७८ वर्षांच्या आपल्या भारतीय समाजोन्नती मंडळाचा इतिहास पाहिल्यास त्यामध्येही हेच पाहायला मिळेल असे भागवत म्हणाले.

आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाची योजना अत्यंत विचारपूर्व करण्यात आली आहे. त्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. ध्वजाच्या सर्वात वरच्या स्थानी भक्ती, त्याग आणि कर्मच्या त्रिवेणीचे प्रतिक असलेला केशरी रंग आहे. कारण याच तीन बाबी पुढील सर्व बाबींचे कारण ठरते. नि:स्वार्थ बुद्धीने त्याग आणि विचारपूर्वक परहिताचे कर्म करणाऱ्यांचे जीवन इतरांना आणि स्वत:लाही प्रतित करते. त्या सूचिततेचा रंग पांढरा आहे. त्याचे फल म्हणून समृद्धी मिळते. त्या समृद्धीचा रंग हिरवा आहे असे ध्वजाच्या रंगाबाबत भागवत यांनी विषद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान देताना संसदेत केलेल्या भाषणातील एका वाक्यात बंधू-भाव हाच धर्म असल्याची व्याख्या केली होती. एकमेकांसोबतच्या सद्भावनेच्या आधारावर समाज चालत असतो असेही भागवत यांनी स्पष्ट केले.

देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेकांना शंका होती की, हे कसे जगतील. परंतु आपण जगलो. आक्रमणांवर आपण प्रतिकार केला. १९७१ मध्ये आपण जेव्हा युद्ध जिंकलो तेव्हा सगळे जग आपल्याकडे आदराने पाहू लागले. जेव्हा-जेव्हा आपला देश पुढे गेला. त्यावेळेस आपल्या देशात आणि विदेशात राहणाऱ्या आपल्या भारतीयांना उन्नतीचा अनुभव झाला असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader