ठाणे : ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाचे जाळे आहे. परंतु हे महामार्ग आता धोक्याचे ठरत आहे. राज्यातील अपघात प्रवण क्षेत्राचा २०२१ ते २०२३ या कालावधीच्या अहवालानुसार ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर २७ ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहेत. तर राज्य महामार्गावरही अपघात प्रवण क्षेत्राचे प्रमाण अधिक आहे. सर्वाधिक अपघात प्रवण क्षेत्र ठाणे आयुक्तालय क्षेत्रात आहे.

ठाणे जिल्ह्यातून मुख्य तसेच अंतर्गत मार्गांचे जाळे मोठ्याप्रमाणात आहे. उरण जेएनपीटी येथून सुटणारी हजारो अवजड वाहने राष्ट्रीय महामार्गाने गुजरात, भिवंडीमध्ये जात असतात. जिल्ह्यात मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गासह, कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई पुणे महामार्ग जातात. तसेच राज्य महामार्गाचे जाळे देखील मोठे आहे.

राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग एकमेकांना जोडले गेलेले आहेत. या महामार्गांवर हलक्या वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात असते. रस्ते अपघातांच्या परिभाषेत एकाच ठिकाणी तीन वर्षात झालेल्या अपघातामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिंचा मृत्यू झाल्यास त्या जागेला अपघातप्रवण क्षेत्र घोषित केले जाते. जिल्ह्यातील सरकारी यंत्रणांनी ठाणे जिल्ह्यात २०२१ ते २०२३ या कालावधीच्या अपघात प्रवण क्षेत्राची माहिती संकलित केली.

त्यामध्ये अपघात प्रवण क्षेत्रात ठाणे आयुक्लायाच्या हद्दीतून जाणाऱ्या ( ठाणे, भिवंडी, डोंबिवली ते बदलापूर ही शहरे) राष्ट्रीय महामार्गावर १३ ठिकाणी, ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून जाणाऱ्या (भिवंडी ते आसनगाव) राष्ट्रीय महामार्गातील नऊ ठिकाणी आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर एकूण २७ अपघात प्रवण क्षेत्र आहेत.

ही अपघात प्रवण क्षेत्र कमी करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील पोलीस, रस्ते संदर्भातील सर्वच यंत्रणांची असते. तसेच राज्य महामार्गावरही मोठ्याप्रमाणात अपघात प्रवणक्षेत्र आहेत. नवी मुंबईत एका ठिकाणी आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाच ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र आहेत.

राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून जनजागृती केली जाते. तसेच विविध शाळा, महाविद्यालयांमार्फत वेगवेगळे उपक्रम आम्ही घेतले होते. – रुपाली अंबुरे, अधीक्षक, महामार्ग पोलीस.

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील काही महत्त्वाची अपघातप्रवण क्षेत्रे

– ठाण्यातील घोडबंदर येथील चितळसर, ब्रम्हांड सिग्नल , कापूरबावडी येथील तत्वज्ञान विद्यापीठ परिसर, ओवळा सिग्नल, गायमुख, वाघबीळ आणि नवी मुंबई येथील नवादा फाटा या रस्त्याचा सामावेश आहे.

नवी मुंबईतील अंतर्गत महत्त्वाचे मार्ग धोक्याचे

नवी मुंबई शहरातील अंतर्गत मार्गावरही धोक्याचे आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकूण २५ ठिकाणी अंतर्गत मार्गावर अपघात प्रवण क्षेत्र आहेत. यामध्ये तुर्भे येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप ते तुर्भे रेल्वे स्थानक, तुर्भे नाका, वाशी खाडी पूल, वाशी गाव सिग्नल या रस्त्यांचा सामावेश आहे.