खरं तर लहानपणापासूनच त्याला चित्रकलेची आवड होती, पण वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे त्याचे अवघे कुटुंबच पोरके झाले. आर्थिक विवंचनेमुळे त्याला कोवळय़ा वयातच वसतिगृहात राहावे लागले. वयाच्या सातव्या वर्षीच आई आणि भावंडांपासून दूर राहावं लागल्यामुळे त्याच्या मनावर आघात झाला. पण हे दु:ख दूर करून उज्ज्वल भविष्य रेखाटण्यासाठी आपल्या कलेलाच त्याने अस्त्र बनवले. अत्यंत हलाखीच्या आणि संघर्षपूर्ण परिस्थितीत शिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशांत शिखरेने ‘अ‍ॅनिमेशन’ क्षेत्रात पाऊल टाकले आणि त्याच्या कौशल्याची चमक दिसू लागली. त्याने बनवलेल्या ‘कोमल’ या माहितीपटाला ६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘उत्कृष्ट शैक्षणिक’ माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. जिद्द आणि गुण यांच्या जोरावर खडतर परिस्थितीशीही यशस्वीपणे चार हात करता येतात, याचे उत्तम उदाहरण ठरू शकणारा प्रशांत शिखरे आज डोंबिवलीतील एका सुखवस्तू निवासी संकुलात वास्तव्याला आहे.
साताऱ्यातील करंजखोप गावचा मूळ रहिवासी असलेला प्रशांत सहा-सात वर्षांचा असताना त्याच्यावरील पितृछत्र हरपले. आर्थिक परिस्थिती बेताची असताना वडिलांच्या मृत्यूने प्रशांतचे अवघे कुटुंबच कोलमडून पडले. तीन चिमुरडय़ांच्या खाण्यापिण्याचीही आबाळ होऊ लागल्यानंतर प्रशांतच्या आईने त्याला वसतिगृहात ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या इयत्तेत शिकत असताना प्रशांत मानखुर्द येथील एका वसतिगृहात दाखल झाला. अशा वेळी लहानपणापासूनची जोडीदार असलेली चित्रकला हेच त्याचे सर्वस्व बनले. शैक्षणिक जीवनातील चित्रकलेच्या प्रत्येक परीक्षेमध्ये प्रशांतने चांगले यश मिळवले. याच क्षेत्रात करिअर घडवण्याच्या इच्छेने त्याने जे. जे. महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा प्रयत्नही केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. याच काळात ‘अ‍ॅनिमेशन’ या नवख्या क्षेत्रातील कलाकारांशी त्याचा संपर्क झाला आणि त्याच्या कलेला एक व्यासपीठ मिळाले. ‘यूटीव्ही’ या कंपनीसाठी काम करत असताना त्याने अनेक अ‍ॅनिमेशनपटांच्या निर्मितीत सहभाग घेतला. हनुमान, टूनपूर का सुपर हिरो अशा अ‍ॅनिमेशनपटांसाठी त्याने काम केले. सरकारच्या ‘चाइल्ड लाइन १०९८’ या लहान मुलांसाठीच्या मदतवाहिनीसाठी त्याने बनवलेल्या चार लघुपटांना आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मानित करण्यात आले. त्यापैकी ‘कोमल’ या लघुपटाला ६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळय़ात ‘सवरेत्कृष्ट शैक्षणिक माहितीपट’ म्हणून गौरवण्यात आले.
आपली आर्थिक परिस्थिती सुधारताच प्रशांतने २००९मध्ये डोंबिवलीतील लोढा विहार सोसायटीत घर घेतले आणि आई-भावंडांसह स्थायिक झाला. ‘आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरू असून राष्ट्रीय पुरस्काराने या संघर्षांला एक आत्मविश्वास दिला आहे,’ असे तो सांगतो. ‘अ‍ॅनिमेशनच्या क्षेत्रात मिळालेले स्थान अधिक उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील राहायचे आहे,’ असा निर्धार त्याने व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रशांतची ‘लघुपट’ भरारी
* प्रशांत शिखरे याने चाइल्ड लाइन फाऊंडेशनसाठी कोमल, लाइक सिस्टर, एज्युकेशन काऊंट, द रोज या चार लघुपटांची निर्मिती केली आहे.
* त्याच्या लघुपटांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (उत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट), ‘फिक्की’ पुरस्कार, पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया नॅशनल अ‍ॅवॉर्डने गौरवण्यात आले आहे.
* अ‍ॅमी आर्ट फेस्टिव्हल (ब्राझिल), अ‍ॅथन्स राष्ट्रीय लघुपट चित्रपट महोत्सव, जीबीव्ही फेस्टिव्हल मुंबई, अ‍ॅनिफेस्ट, राष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवामध्येही या लघुपटांचे कौतुक झाले.

प्रशांतची ‘लघुपट’ भरारी
* प्रशांत शिखरे याने चाइल्ड लाइन फाऊंडेशनसाठी कोमल, लाइक सिस्टर, एज्युकेशन काऊंट, द रोज या चार लघुपटांची निर्मिती केली आहे.
* त्याच्या लघुपटांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (उत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट), ‘फिक्की’ पुरस्कार, पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया नॅशनल अ‍ॅवॉर्डने गौरवण्यात आले आहे.
* अ‍ॅमी आर्ट फेस्टिव्हल (ब्राझिल), अ‍ॅथन्स राष्ट्रीय लघुपट चित्रपट महोत्सव, जीबीव्ही फेस्टिव्हल मुंबई, अ‍ॅनिफेस्ट, राष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवामध्येही या लघुपटांचे कौतुक झाले.