कल्याण- पत्रीपुलाजवळ आजोबांच्या हातामधून नाल्यात पडून उल्हास खाडीत वाहून गेलेल्या चिमुकलीच्या शोधाचे कार्य गुरुवारी संध्याकाळी बचाव पथकांनी थांबविले. राष्ट्रीय आपत्ती दलाचे जवान, कल्याण डोंबिवली पालिका आधारवाडी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी गुरुवारी संकाळपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत आधारवाडी ते दिवा, मुंब्रा परिसरातील खाडी किनारा परिसरात चिमुकलीचा शोध घेतला. कोठेही रिषिका बाळ आढळून न आल्याने अखेर गुरुवारी संध्याकाळी बचाव पथकांनी शोध मोहीम थांबवली.
हद्य पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. शोध लागला पाहिजे म्हणून प्रत्येक जण प्रार्थना करत होते. हैदराबादच्या राहणाऱ्या योगिता रुमाले भिवंडीमध्ये आपल्या आई-वडिलांकडे प्रसूतीसाठी आल्या आहेत. जन्मजात रिषिकाला आजार असल्याने तिच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. सहा महिन्यांनी तिला मुंबईत न्यावे लागत होते. मुसळधार पाऊस असुनही बुधवारी आई योगिता, तिचे वडिल ज्ञानेश्वर पोगूल रिषिकाला घेऊन मुंबईत गेले. परतत असताना मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होती. अंबरनाथ लोकलमधून परत येत असताना पत्रीपुलाजवळ लोकल बराच उशीर लोकल उभी होती. लोकल कल्याण रेल्वे स्थानकात जाण्याची चिन्हे नव्हती. योगिता, आजोबा सुखरुप पत्रीपुलाजवळ उतरले. इतर प्रवाशांप्रमाणे रेल्वे मार्गातून कल्याण स्थानकाकडे पायी जाऊ लागले. बाळ आजोबांच्या जवळ होते. पत्रीपुलाजवळील अरुंद जागेतून बाजुला नाला असलेल्या भागातून जाताना आजोबांचा पाय घसरला आणि हातामधील रिषिका नाल्यात पडली. बाळ नाल्यात पडल्याने योगिताने हंबरडा फोडला.
हेही वाचा >>>डोंबिवलीत बँकेतून बाहेर पडताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले
समाज माध्यमात या घटनेची दृश्यचित्रफित फिरू लागल्यानंतर सरकारी यंत्रणांनी या घटनेची माहिती घेतली. बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत अग्निशमन जवान, राष्ट्रीय आपत्ती दलाच्या जवानांनी रिषिकाचा खाडी किनारा परिसरात शोध घेतला. मुसळधार पाऊस, खाडी दुथडी वाहत असल्याने बचाव कार्यालयात अडथळे येत होते. त्यामुळे रात्री ही मोहीम थांबविण्यात आली.
तहसीलदार जयराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून आपत्ती दल पथकांनी पत्रीपूल, मोठागाव, कोपर, दिवा, मुंब्रा परिसरात खाडीच्या दोन्ही बाजुची झुडपे, किनारे भागात दुपारपर्यंत शोध घेतला. बाळ आढळून न आल्याने त्यांनी बचाव कार्य थांबविले. आधारवाडी अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी हरी भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी दुर्गाडी, आधारवाडी परिसर ते साईबाबा मंदिरापर्यंत दुतर्फा बाळाचा शोध घेतला. संध्याकाळपर्यंत हे शोध कार्य सुरू होते. वेगवान प्रवाहामुळे शोध कार्यात अडथळे येत होते. त्यामुळे जवानांनी संध्याकाळी आपले बचाव कार्य थांबविले.
हेही वाचा >>>ठाणे: मतदान केंद्रस्तरीय अधिकारी देणार घरोघरी भेटी, मतदार यादी पुनरिक्षणाअंतर्गत २१ जुलैपासून
“ आपत्ती दल, अग्निशमन जवानांनी आधारवाडी ते मुंब्रा परिसरात बाळाचा शोध घेतला. दिवसभर हे काम सुरू होते. आता बाळाचे शोध कार्य थांबविले आहे.”,- जयराज देशमुख, तहसीलदार.
“आधारवाडी, दुर्गाडी खाडी परिसराच्या दुतर्फा झुडपांमध्ये, किनारी बाळाचा शोध घेतला. बाळ आढळून न आल्याने बचाव कार्य संध्याकाळी थांबविले.”-हरि भडांगे,अग्निशमन अधिकारी,कल्याण.