अंबरनाथ नगरपालिकेने चिखलोली परिसरात सुरू केलेली कचराभूमी बंद करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. तात्काळ या ठिकाणी कचरा टाकणे बंद करून पर्यायी जागेवर कचरा टाकण्याचेही लवादाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे चिखलोली येथील कचराभूमीच्या शेजारी असलेल्या रहिवाशांची दुर्गंधी आणि कचराभूमीपासून सुटका होणार आहे. चार महिन्यांपासून येथील रहिवासी राष्ट्रीय हरित लवादात कचराभूमीविरूद्ध लढा देत होते. अंबरनाथ पालिकेला लवादाने दंडही ठोठावला असून त्याचा भरणा करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा >>>कल्याण मध्ये बुलेट चालकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, नाक, हाताचे हाड मोडले
अंबरनाथ शहराचा कचराप्रश्न गेल्या काही वर्षात गंभीर बनला आहे. अनेक वर्षांपासून अंबरनाथ पालिका ज्या मोरिवली भागात कचरा नेऊन टाकत होती ती जागा कनिष्ट न्यायालयाच्या उभारणीनंतर बंद करावी लागली. त्यामुळे गेल्या वर्षात नगरपालिकेच्या वतीने चिखलोली भागातील सर्वेक्षण क्रमांक १३२ येथे कचरा टाकण्यास सुरूवात केली. सुरूवातीला कचऱ्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कचऱ्याचा त्रास जाणवला नाही. मात्र यंदाच्या वर्षात पावसाळ्यात या कचऱ्यातून पाणी झिरपून ते आसपासच्या रहिवाशांच्या जमिनीतील पाण्याच्या टाक्यांपर्यंत पोहोचले. दुषीत पाणी, दुर्गंधी आणि डासांमुळे त्रस्त स्थानिकांनी या कचराभूमीविरूद्ध राष्ट्रीय हरित लवादात धाव घेतली होती. त्यानंतर लवादाने अंबरनाथ नगरपालिका, स्थानिक प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाहणीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पाहणी करत कचराभूमीचा नागरिकांना त्रास असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीत पालिका प्रशासनाला अनेक सूचना दिल्या होत्या. त्यात पर्यायी जागा हा महत्वाचा पर्याय होता. मात्र तो उपलब्ध न झाल्याने त्याच ठिकाणी कचरा टाकणे सुरू होते. अखेर या सुनावणीच्या शेवटी या कचराभूमीवर कचरा टाकणे तातडीने बंद करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. पालिकेने संयुक्त घनकचरा प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या बदलापूर येथील वालिवलीच्या सर्वेक्षण क्रमांक १८८ या भुखंडावर कचरा टाकण्याचेही लवादाने सांगितले आहे. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेला आता चिखलोली येथील कचराभूमीवर कचरा टाकणे बंद करावे लागणार आहे. या निर्णयाबद्दल स्थानिकांनी लवादाचे आभार मानले आहेत.
हेही वाचा >>>ठाणे: दारु पिण्यावरुन कारणावरून एकाची हत्या
दंडही ठोठावला
कचरा थांबवणे बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरही पालिकेने त्याच ठिकाणी कचरा टाकल्याने लवादाने पालिकेला दंड ठोठावला आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाकडे प्रति महिना एक लाख रूपये दंड जमा करण्याचे आदेश अंबरनाथ नगरपालिकेला देण्यात आले आहेत. यापूर्वी अंबरनाथ नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाचे नियम भंग केल्याबद्दल ३१ लाख रूपयांचा दंड प्रदुषण नियंत्रण मंडळाला अदा केला आहे, अशी माहिती प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.