द नेटिव्हिटी ऑफ अवर लेडी चर्च, पालघर

डोंगर आणि समुद्राचे सान्निध्य लाभलेल्या पालघरमधील द नेटिव्हिटी ऑफ अवर लेडी चर्चमध्ये अन्य धर्मीय बांधवही प्रार्थनेसाठी येतात. हे चर्च नाक्याजवळ असल्यामुळे वाहतूक करणाऱ्या लोकांची वर्दळ या ठिकाणी सतत असते. मात्र त्यामुळे येथील चर्चमधली शांतता भंग होत नाही. भाविकांच्या प्रार्थनेत ध्वनिप्रदूषणामुळे व्यत्यय येऊ नये याची काळजी अभियंत्याने घेतली आहे. हे चर्च अत्याधुनिक असल्यामुळे चर्चची वेदी ही आधुनिक स्वरूपाची आहे. त्या चर्चचे विशेष म्हणजे तिथे बाहेरून आणलेली पवित्र मरियेची मूर्ती लोकांना अधिक जिव्हाळ्याची वाटते.

पालघर पट्टय़ातील तारापूपर्यंतच्या चर्चेसपैकी मराठय़ांच्या संघर्षांच्या वेळी काही जमीनदोस्त झाली. या वेळी अनेक ख्रिस्ती बांधव गुजरातजवळ स्थलांतरित झाले तर काही ख्रिस्ती कुटुंबे पालघरमध्ये स्थायिक झाली. पालघर स्थानकाजवळ लोकवस्ती वाढल्याने तिथे एक चर्च असावे अशी तेथील ख्रिस्ती बांधवांची इच्छा होती. त्यावेळेला हिंदू धर्मातून ख्रिस्ती धर्मात आलेले फादर सदानंद हे विचारवंत धर्मगुरू झाले. त्यांनी १९५६ साली त्यांच्या सहकार्याच्या मदतीने चर्चच्या उभारणीची इच्छा व्यक्त केली.

त्यांनी आनंदाश्रम नावाच्या शाळेचीही उभारणी केली. त्यांची इच्छा फलद्रूप होऊन फादर व्हॅलेंटाइन पावकर द नेटिव्हिटी ऑफ अवर लेडी हे चर्च ८ डिसेंबर २००० रोजी उभे केले. पालघर येथील हे नवे चर्च पालघरमधील जुन्या व नव्या पिढीच्या भाविकांचे आध्यात्मिक संगोपन करत आहे. दमण येथील दिसा या अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली चर्च उभे केले आहे. या चर्चमध्ये सुमारे १२०० ख्रिस्ती भाविक येतात. फादर विल्यम फरेरा हे प्रमुख धर्मगुरू आहेत व फादर प्रदीप डाबरे हे शाळेचे मुख्याध्यापक आहेत.

Story img Loader