महोत्सवामुळे परिसर अस्वच्छ झाल्याचा स्थानिकांचा आरोप
ठाणे : निसर्गरम्य उपवन परिसर नुकत्याच झालेल्या महोत्सवानंतर अस्वच्छ झाला आहे. महोत्सवाची सांगता होऊन आठवडा उलटत आला तरी कचरा उचलण्याचे सौजन्य आयोजक, महापालिकेने दाखविले, नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
ठाण्यातील निसर्गरम्य उपवन तलावाकाठी नुकताच मोठा गाजावाजा करत एक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महोत्सवादरम्यान तलाव परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले होते, मात्र झालेला कचरा उचलण्याची तसदी आयोजक वा महापालिकेने घेतलेली नाही.
पाण्याच्या बाटल्या, पत्रावळी, प्लास्टिकचे ग्लास आणि सजावटीकरणासाठी लागणारे साहित्य इत्यादींचा कचरा तलावाभोवती पडला आहे. स्वच्छ ठाणे शहराचा डंका पिटणारी ठाणे महापालिका देशात स्वच्छ शहराचे मानांकन मिळवण्यासाठी निरनिराळे उपक्रम राबवते. टेकबिन, अद्ययावत स्वच्छतागृह, ओला कचरा-सुका कचरा संकलन मोहीम यांसारखे विविध प्रकल्प महापालिकेकडून राबवण्यात येत असले तरी त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. असे असताना उपवनला मात्र गेल्या चार वर्षांपासून कचऱ्याचा विळखा पडला आहे. नुकताच येथे एक महोत्सव झाला. त्यानिमित्त उपवन परिसरात मोठय़ा प्रमाणावर सुशोभीकरण करण्यात आले होते. तरंगता रंगमचही उभारण्यात आला होता. मात्र महोत्सव संपल्यापासून तलावाकाठी कचरा विखुरला आहे. सध्या येथे बुरुज आणि घाट बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामागील बाजूस जेवणासाठीच्या सामग्रीचा कचरा पडला आहे. तलावाच्या बाजूलाच असलेला हा कचरा कुजून उग्र वास येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उपवन तलावाच्या सभोवताली रोज शेकडो लोक फेरफटक्यासाठी येतात. कचऱ्यामुळे अस्वच्छता पसरल्याने नागरिकांकडून प्रशासनाविरोधात टीकेचा सूर उमटत आहे. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही, तर महोत्सवाच्या आयोजकांची प्रतिक्रियाही मिळू शकली नाही.
निर्माल्य कलशातील कचराही रस्त्यावर
नागरिकांनी निर्माल्य तलावात टाकू नये यासाठी तलावाकाठी निर्माल्य कलश उभारण्यात आला आहे. मात्र निर्माल्याचे प्रमाण मोठे असून या कलशातील निर्माल्य महापालिकेकडून वेळेवर संकलित केले जात नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी निर्माल्य कलशांतून कचरा ओसंडून वाहून रस्त्यावर येत आहे. महोत्सवाच्या काळात निर्माल्य कलशातील कचराही वाढल्याचे नागरिकांनी सांगितले.