वनविभागाचा प्रकल्प जूनपासून खुला; ५० एकर जागेवर वनराईचे दर्शन
वनराईचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे तसेच मुंबईसह परिसरातील पर्यटकांना शहराजवळच पर्यटनाचे एखादे केंद्र उभे राहावे यासाठी ठाणे वनविभागाने टिटवाळाजवळील म्हस्कळ येथील काळू नदीच्या किनाऱ्यावर सुमारे पन्नास एकर क्षेत्रात निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्यास सुरुवात केली आहे. येत्या महिनाभरात हा प्रकल्प पूर्ण करून पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे, असे वनविभागातील वरिष्ठ सूत्रांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला सांगितले. सुमारे ९५ लाखांचा निधी खर्चून उभारण्यात आलेले हे ठाणे जिल्ह्य़ातील वनविभागाचे पहिलेच पर्यटन केंद्र असल्याचा दावाही करण्यात येत आहे.
वनविभागाच्या कुंदा परिमंडळात सव्र्हे क्रमांक १४२ मध्ये पर्यटन केंद्र विकसित करण्यात येत आहे. काळू नदीच्या किनारी हे पर्यटन केंद्र असल्याने त्यास विशेष महत्त्व असणार आहे. कल्याण जनता सहकारी बँक आणि ठाणे भारत सहकारी बँक यांनी म्हस्कळ येथील वनविभागाची ५० एकर जमीन करारबोलीने वृक्षसंवर्धन करण्यासाठी ताब्यात घेतली होती. म्हस्कळच्या वनराईत बँकांनी १४० प्रकारच्या २० हजार रोपांची लागवड करून ही सर्व झाडे जगवली. उपजत जंगली झाडांचे संवर्धन केले. नक्षत्र बाग, मसाल्याची पदार्थाची लागवड, रबराची झाडे अशा विविध लागवडी करून ठाणे जिल्ह्य़ातील जमीन विविध प्रकारच्या लागवडींना योग्य आहे हे दाखवून दिले. बँकांनी विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, पर्यावरणप्रेमी, पक्षीप्रेमींना वनीकरण प्रकल्पात आमंत्रित करून त्यांच्या हातून वृक्षारोपणाचे कार्यक्रम करविले. विद्यार्थ्यांना आमंत्रित करून त्यांच्याकडून रोपे लावून घेतली. वनराईत वनतळी बांधली, पक्ष्यांसाठी खाद्य व कृत्रिम घरटी तयार केली. त्यामुळे या परिसरातील पक्ष्यांची संख्या आणि अधिवास वाढला.
वनराई फुलू व बहरू लागल्यावर या वनराईत पर्यटन केंद्र विकसित करण्याचा बँकांचा प्रयत्न होता. २००७ ते २०१४ या कालावधीत वनीकरणाचा प्रकल्प या दोन्ही बँकांच्या ताब्यात होता, त्यानंतर बँकांबरोबरचा वनीकरणाचा करार नूतनीकरण करण्यास वनविभागाने नकार दिला. त्यामुळे २०१४ मध्ये बँकांना म्हस्कळ वनराईवरील ताबा सोडावा लागला. असे असताना याच ठिकाणी वनविभागाने पर्यटन केंद्र विकसित करण्याचा निर्णय घेतला.
असा असेल प्रकल्प
- बारमाही वाहणाऱ्या काळू नदीच्या किनाऱ्यावर निवासासाठी राहुटय़ा बांधण्यात येतील.
- या ठिकाणीच भोजनाची सुविधा असेल.
- नदीकिनारी बाकडे बसवण्यात येतील.
- पक्षी, वन्यजीव, निसर्ग पाहण्यासाठी दोन उंच मनोरे उभारण्यात येतील.
- नदीत भ्रमंती करण्यासाठी बोटसेवा सुरू करण्यात येणार असून, येथे फिशिंग पॉइंटही उपलब्ध करून देण्यात येईल.
- नराईत भ्रमंतीवाट करण्यासोबत नक्षत्रवनदेखील उभारण्यात येणार आहे.
मुंबई, ठाणे परिसरांतील शहरवासीय सुट्टीचा हंगाम किंवा निसर्ग भ्रमंती म्हणून अनेक वेळा लोणावळा, माथेरान, माळशेज घाटात जातात. अशा हौशी मंडळींना शहरापासून थोडय़ा अंतरावर निसर्ग पर्यटन केंद्र उपलब्ध करून द्यावे, या हेतूने टिटवाळ्याजवळील म्हस्कळ येथील पर्यटन केंद्र विकसित करण्यात येत आहे.
– के. डी. ठाकरे, उप वनसंरक्षक, ठाणे.