ठाणे : पत्नी सोडून गेल्याने उच्च शिक्षित तरुणावर रिक्षा चोरीची वेळ आली. शबाब हुसेन नायाब हुसेन रिझवी सैयद (४१) असे चोरट्याचे नाव आहे. रिक्षा चोरी केल्यानंतर ती रिक्षा इंधन असे पर्यंत प्रवासी वाहतुकीसाठी वापरायचा. इंधन संपल्यानंतर ती रिक्षा जिथे आहे तिथेच सोडून द्यायचा. प्रवाशांकडून मिळालेल्या पैशांतून तो अमली पदार्थ विकत घेत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. रिक्षा किंवा वाहन चोरी त्याने युट्यूब चित्रीकरण पाहून शिकल्याचेही त्याने कबूल केले.
काही दिवसांपूर्वी नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक रिक्षा चोरीला गेली होती. याप्रकरणी रिक्षा चालकाने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल होता. दरम्यान, अपर पोलीस आयुक्त विनाक देशमुख, उपायुक्त सुभाष बुरसे, साहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढमाळे, नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक शरद कुंभार यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली नौपाडा पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला.
पोलिसांनी शहरातील ७० ते ८० सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, शबाब हुसेन नायाब हुसेन रिझवी सैयद याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने नौपाडा, वागळे इस्टेट, राबोडी भागात वाहन चोरी आणि इतर चोरीचे गुन्हे केले असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून चार रिक्षा, एक दुचाकी आणि रोकड असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्या अटकेमुळे सात गुन्हे उघडकीस आले आहे. तसेच, यापूर्वी त्याच्याविरोधात नौपाडा, कोपरी आणि मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते.
पत्नीसोडून गेली आणि चोरीला सुरुवात
शबाब याचे एम काॅम पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्याने यापूर्वी एका आयटी कंपनीमध्यये डेटा एन्ट्री ऑपरेटरचे म्हणून काम केले होते. त्यानंतर त्याने दुबई येथे विमानतळालगत वाहन चालक म्हणूनही काम केले. भारतात परतल्यानंतर त्याची पत्नी त्याला सोडून गेली. त्यानंतर तो अमली पदार्थांच्या आहारी गेला. त्याने अमली पदार्थासाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी रिक्षा आणि वाहन चोरी करण्यास सुरुवात केली.
चोरीची कार्यपद्धती कशी होती ?
आरोपीने युट्यूब या माध्यमातून रिक्षा, दुचाकीचे स्विच कसे असते, ते कसे तोडायचे याचे चित्रीकरण पाहिले. त्यानंतर त्याने रिक्षा आणि दुचाकी चोरी सुरु केली. रिक्षा चोरल्यानंतर तो रिक्षामध्ये इंधन आहे की नाही ते पाहत असे. इंधन पुरेसे असल्यास तो ती रिक्षा प्रवासी भाडे वाहतुकीसाठी करत होता. त्याद्वारे मिळणाऱ्या पैशांतून तो अमली पदार्थ खरेदी करायचा. इंधन संपल्यानंतर तो रिक्षा तेथेच सोडून द्यायचा.