मुंबई-अहमदाबाद हायवेवर वज्रेश्वरी फाटय़ावर वळल्यावर अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्या स्थळांचे आपले एक महत्त्व आहे. सौंदर्यातील वेगळेपण आहे. येथील निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी, वेगवेगळ्या ऋतूत येथे होत असलेले बदल अनुभवण्यासाठी या ठिकाणांना भेट द्यायलाच हवी. प्रवासाचा आनंद घेत तेथील भौगोलिक सामाजिक परिस्थितीचे वैशिष्टय़ जाणून घेणे हा आनंद नक्कीच अनुभवण्यासारखा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वज्रेश्वरी-भिवंडी हा रस्ता नुसता प्रवासाचा आनंद घेण्यासाठीसुद्धा सुंदर आहे. एक तर तो छान गुळगुळीत आहे आणि दुसरं म्हणजे प्रत्येक ऋतूत या परिसराचं सौंदर्य अत्यंत मोहक दिसते. हिवाळ्यात हा रस्ता स्वप्निल धुक्यात हरवलेला असतो. पावसाळ्यात डोळ्यांचे पारणे फेडणारी हिरवीगार भातशेती आणि आता उन्हाळ्यात तो रंगीबेरंगी फुलांनी सुशोभित असतो. पिवळे पेल्टोफोरम, किरमिजी सावर आणि लालचुटुक पांगाऱ्यांचे घोस उन्हाळा सुखद बनवतात. या रस्त्यावर वडाचे खूप जुने, उंच वाढलेले वृक्ष आहेत. डेरेदार छाया देणारे पर्जन्यवृक्ष ही आहेत. विलायती चिंचांचे अनेक वृक्षही या वाटेवर आहेत. त्यामुळे उन्हाचा कडाका जाणवत नाही व शीतल छायेतून प्रवास सुखाचा होतो.

वज्रेश्वरी मंदिरापुढचा डावा रस्ता आपल्याला जलाराम धाम इथे घेऊन जातो. आत जाताच बोगनविलाचे बहरलेले गडद गुलाबी आणि शुभ्र बहर आपले प्रसन्न स्वागत करतात. खरे तर हा एक ज्येष्ठ नागरिक निवास आहे, परंतु माफक दरात इथे निवास व भोजनाची सोय इतर लोकांसाठीही उपलब्ध आहे. सर्व निवासालये स्वच्छ आणि सुरक्षित आहेत. भोजनही अतिशय सात्त्विक असते. रविवार व गुरुवारी इथे विनामूल्य महाप्रसाद असतो. विस्तीर्ण व स्वच्छ परिसर आणि संत जलाराम बाप्पा साई बाबा व श्रीराम यांची मंदिरे सुरेख आहेत. एका मंदिरात काचेच्या पेटीत ‘मिनिएचर’ देखावा उभारला आहे. त्यातले बारीकसारीक तपशील आवर्जून बघण्याजोगे आणि दाद देण्याजोगे आहेत. इथे राहून आपण आजूबाजूच्या परिसराला भेट देऊ  शकतो. वज्रेश्वरी मंदिर, श्री नित्यानंद स्वामींचा आश्रम, अकलोली व गणेशपुरी इथली गरम पाण्याची कुंडे तुंगारेश्वर हा परिसर इथून जवळ आहे. ज्येष्ठांना घेऊन एखादा वीकेंड घालवायला हे ठिकाण आदर्श म्हणता येईल.

तसेच दुसरे ठिकाण म्हणजे असनोली येथल्या नऊकुलदेवी! पोटासाठी म्हणा व शिक्षणासाठी म्हणा, विविध कारणांनी माणसाला आपले गाव, प्रदेश सोडून स्थलांतरीत व्हावे लागते. परंतु जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपली मुळे अथवा रूट्स त्याला साद घालत असतात. त्यामुळे स्थैर्य मिळताच तो आपल्या श्रद्धेनुसार आपल्या देवतांची उपासना करणे, त्यांचे मंदिर उभारणे अशा कामांना प्रारंभ करतो. समान आस्थेची मंडळी अशा ठिकाणी एकत्र येतात, सुख-दु:खांची देवाणघेवाण होते व त्यातून परस्परांमध्ये आपलेपणा वाढीस लागतो. परदेशात गेलेल्या हिंदूंनी उभारलेली देवळे या गोष्टींची साक्ष देतात.

कच्छच्या रणात वसलेला जो कच्छी राजगोर समाज आहे, तो ही असाच पोटापाण्यासाठी भारतभर विखुरलेला. तरीही आपल्या गावात वसलेल्या कुलदेवतेवर श्रद्धा ठेवून असलेला. भौगोलिक अंतरामुळे वारंवार आपल्या देवीचे दर्शन घ्यायला जाणे जमत नसल्याची खंत मनोमन बाळगणारा. कच्छी समाजातल्या विविध घराण्यांच्या देवता वेगवेगळ्या गावांत वसलेल्या आहेत. त्या सर्वाचे दर्शन घ्यायचे तर त्या साधारण दोनशे किलोमीटर परिसरात विखुरलेल्या आहेत. या सर्वावर उपाय म्हणून या समाजातल्या कृष्णाभाई राजगोर यांनी कच्छच्या नऊदेवींची प्रतिष्ठापना एकाच मंदिरात केली आहे. भिवंडी-वाडा रस्त्यावर अस्नोली गावात हे मंदिर आहे. राष्ट्रीय महामार्गावरून वज्रेश्वरी मंदिरावरून पुढे अंबाडी गावापर्यंत महापालिका तसेच एसटी बस येतात. तिथून पुढे शेअर रिक्षाने या मंदिरापर्यंत पोहचता येते.

मंदिरात प्रवेश केल्यावर समोर सुंदर लाकडी महिरप आहे. चंद्र, सूर्य व मयूरांच्या प्रतिमा त्यावर असल्याने ते सुंदर दिसते. दोन बाजूला काचेची गवाक्ष आहेत आणि संगमरवरी लांबलचक ओटय़ांवर नऊदेवी स्थापित आहेत. सर्व देवींचे चेहरे अतिशय सुंदर व सौम्य आहेत. त्यांनी सर्व शृंगार केलेला असला तरी जवळून त्यांचे दर्शन घेण्याची मुभा आहे. इथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहण्याची व स्वयंपाक करण्याचीदेखील सोय आहे. वेगळ्या संस्कृतीतील एक मनोहर ठिकाण म्हणून अवश्य भेट देण्याजोगे आहे.

नवकुलदेवी व जलाराम धाम

कसे जाल? : वसई रोड आणि विरार स्थानकावरून एसटी महामंडळाच्या बस, महापालिकेच्या बसने जाता येते. वज्रेश्वरीला उतरून जलाराम धामपर्यंत टांगा वा रिक्षा येते. नऊकुलदेवीसाठी अंबाडी इथे उतरून शेअर रिक्षा मिळते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nav kuldevi temples and jalaram dham in vajreshwari