कल्याण- शिवकाळातील आरामाराप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेने खाडी किनारची जागा प्रशस्त जागा नौदल संग्रहालयासाठी निवडली आहे. या नौदल संग्रहालयामुळे विद्यार्थी, नागरिक, पर्यटकांना नौदला बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जिवंत इतिहास पाहता येईल, असे प्रतिपादन भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त उप नौसेनाप्रमुख एस. व्ही. भोकरे यांनी गुरुवारी येथे केले.
हेही वाचा >>> कळवा हत्येचा प्रयत्न;किरकोळ कारणावरून दोघांच्या हत्येचा प्रयत्न
कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीतर्फे दुर्गाडी उल्हास खाडी किनारी नौदल संग्रहालय उभारण्याची कार्यवाही सुरू केली आहे. आरमार उभारण्यात येणाऱ्या या जागेची पाहणी गुरुवारी उप नौसेनाप्रमुख भोकरे, पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा, उपायुक्त धैर्यशील जाधव, सचिव संजय जाधव, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
हेही वाचा >>> उल्हासनगर: बाळासाहेबांची शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी राजेंद्र भुल्लर आणि रमेश चव्हाण यांची निवड
नौदल संग्रहालयात नौदलातून सेवानिवृत्त झालेली टी-८० युध्दनौका विराजमान करण्याचा सामंजस्य करार नुकताच स्मार्ट सिटी कंपनी आणि नौदलात झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपनौसेना प्रमुखांनी आरमार उभारण्यात येत असलेल्या जागेची पाहणी केली. त्यांनी संग्रहालयासाठी निवडण्यात आलेली जागा नौदल संग्रहालयासाठी योग्य असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. या प्रकल्पासाठी सर्वोतपरी सहकार्य देण्याचे आश्वासन भोकरे यांनी दिले.
शिवाजी महाराजांनी कल्याण मध्ये दुर्गाडी येथे पहिल्या आरमाराची उभारणी केली. या भागात खाडी किनारा विकासा बरोबर नौदल संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयाचा आराखडा नौदल विभागाकडून तयार केला जात आहे. १११ मीटर लांबीच्या या संग्रहालयात १७ व्या शतकापासून ते १८ व्या शतकापर्यंत मराठा आरमारात कसे बदल होत गेले. ब्रिटिश राॅयल नौदलापासून ते स्वतंत्र भारताचा नौदल इतिहास या संग्रहालयात मांडण्यात येणार आहे. हा इतिहास चित्रकृती, शिल्प, कलाकृती, चलतचित्राच्या माध्यमातून प्रदर्शित केला जाणार आहे. भारताच्या अरिहंत या पाणबुडीच्या आदर्श समोर ठेऊन हा आराखडा तयार केला जात आहे, अशी माहिती नौदल संग्रहालय सल्लागार सचीन सावंत यांनी दिली.